ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली ७५ लाखांचा गंडा!नाशिकमध्ये पती-पत्नी, मेहुण्यासह सहा जणांवर सायबर गुन्हा दाखल

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक/प्रतिनिधी : नववर्षाच्या सुरुवातीलाच नाशिक शहरात सायबर फसवणुकीचा (Cyber Fraud) खळबळजनक प्रकार उघडकीस आला असून, ऑनलाइन गुंतवणुकीतून भरघोस नफा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला तब्बल ७५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पती-पत्नी, मेहुणा व अन्य तिघांसह सहा जणांविरोधात नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्र्यंबकरोडवरील महात्मानगर परिसरातील एका व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयितांनी त्यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला ओळख वाढवत शेअर मार्केटमधील गुंतवणूक, नफ्याचे गणित, कमी वेळात जास्त परतावा याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विश्वास संपादन झाल्यानंतर ‘झूम’ ऑनलाइन मीटिंगद्वारे मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत वेगवेगळ्या टप्प्यांत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले.
विशेष म्हणजे, ही फसवणूक केवळ ऑनलाइन मर्यादित नव्हती. संशयितांनी नाशिकमध्ये प्रत्यक्ष भेटी घेतल्या, शहरातील नामांकित हॉटेलमध्ये सेमिनार आयोजित करून अनेक नागरिकांना आकर्षित केले. “ऑनलाइन गुंतवणूक, खात्रीशीर नफा आणि कमी जोखीम” अशा शब्दांत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला.
फेब्रुवारी २०२५ ते १९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या तारखांना फिर्यादी व्यावसायिकाकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळण्यात आली. अखेर ही रक्कम संशयास्पद बँक खात्यांमध्ये जमा झाल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. तपासात ७५ लाख रुपये एका बँक खात्यात वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून मिलिंद गाढवे, त्याची पत्नी प्रियंका गाढवे, तिचा भाऊ अर्जुन पाटील, तसेच निलेश व हेमंत जंगम यांची नावे पुढे आली आहेत. हे सर्व संशयित महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांचे लोकेशन ट्रेस करण्यात आले असून, त्यांना अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. २०२६ मधील नाशिक शहरातील हा पहिलाच सायबर गुन्हा असल्याने पोलीस तपासाला प्राधान्य देत असून, आणखी बळी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 ठळक मुद्दे :
२०२६ मधील नाशिक शहरातील पहिला सायबर गुन्हा
 सोशल मीडिया व झूम मीटिंगचा वापर करून फसवणूक
पती-पत्नी व मेहुण्याचा सहभाग
 नाशिकमधील नामांकित हॉटेलमध्ये सेमिनार
 सायबर पोलिसांचे विशेष तपास पथक सक्रिय
 स्थानिक ओळखीचा वापर करून विश्वासघात
 “ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषाला बळी पडू नका, खात्रीशीर तपासणीशिवाय आर्थिक व्यवहार टाळा,” असे आवाहन सायबर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default