निवडणुकीच्या रणधुमाळीत काळ्या पैशांचा खेळ? मुंबईत थेट व्हॅनमधून अडीच कोटींची रोकड जप्त, देवनार हादरले!

फुले शाहू आंबेडकर
0
मुंबई /प्रतिनिधी :  महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या आचारसंहितेदरम्यान मुंबईत खळबळ उडवणारी कारवाई समोर आली आहे. मुंबईच्या देवनार परिसरात निवडणूक भरारी पथकाने थेट दोन व्हॅनमधून तब्बल २ कोटी ३३ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील रोख रकमेने राजकीय व प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.
निवडणूक काळात पैशांचा गैरवापर रोखण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या भरारी पथकाने देवनार परिसरात संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना ही कारवाई केली. दोन व्हॅनची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आली. ही रक्कम ATM मध्ये भरण्यासाठी नेली जात होती, असा प्राथमिक दावा संबंधितांकडून करण्यात आला असला, तरी भरारी पथकाला हा खुलासा संशयास्पद वाटल्याने पुढील कारवाई करण्यात आली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत आयकर विभागाला तातडीने माहिती देण्यात आली आहे. सध्या ही संपूर्ण रोकड देवनार पोलिस ठाण्यात कस्टडीमध्ये ठेवण्यात आली असून, पोलिसांनी घटनेची नोंद स्टेशन डायरीत केली आहे. ही रक्कम नेमकी कुठून आली, कोणासाठी आणि कुठे नेली जात होती, याचा सखोल तपास सुरू आहे.
निवडणूक काळात मतदारांना पैसे, वस्तू किंवा अन्य आमिषे दाखवून प्रभाव टाकण्याचे प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळेच मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नाकाबंदी, वाहन तपासणी आणि संशयित हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. विशेषतः शहरांच्या प्रवेशद्वारांवर ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी सुरू आहे.
देवनारमधील ही कारवाई म्हणजे केवळ सुरुवात आहे का, की एखाद्या मोठ्या आर्थिक गैरप्रकाराचा पर्दाफाश होणार आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आयकर विभागाच्या चौकशीतून या रकमेचे खरे गूढ उलगडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आचारसंहिता सुरू असताना सापडलेली ही अडीच कोटींची रोकड म्हणजे लोकशाही प्रक्रियेसाठी गंभीर इशारा मानला जात असून, येत्या काळात अशा कारवायांचा वेग आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default