सत्यनिष्ठ पत्रकारितेचा जल्लोष! मराठी दक्ष पत्रकार संघाच्या ९व्या दिनदर्शिकेचे दिमाखदार प्रकाशन

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर/प्रतिनिधी
मराठी पत्रकारितेच्या विश्वात निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकीचा ठसा उमटवणाऱ्या मराठी दक्ष पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघाच्या ९ व्या वर्धापन दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा धुळ्यात अत्यंत उत्साहपूर्ण, विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
या भव्य सोहळ्याचे उद्घाटन आर. सी. पटेल सोसायटीच्या सचिव आदरणीय रेषा पटेल मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी धुळे जिल्हा ग्रंथालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आदरणीय जगदीश पाटील, आर. सी. पटेल संकुलाचे प्राचार्य, तसेच प्रसिद्ध साहित्यिक सुभाष अहिरे, भरत रोकडे, श्रावण पाटील, निरंजन महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात सत्यशोधक खान्देश या वैचारिक चळवळीचे संपादक प्रा. कचरू अहिरे, मराठी दक्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष दिनकर पवार, तसेच जिल्ह्यातील विविध सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, पत्रकार, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारितेची समाजातील भूमिका अत्यंत ठाम शब्दांत मांडली. सत्यनिष्ठ पत्रकारिता ही लोकशाहीची मजबूत आधारस्तंभ आहे, असे सांगत ग्रामीण भागातील प्रश्न, शोषित-वंचितांचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्याची जबाबदारी पत्रकारांवर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. डिजिटल युगात पत्रकारितेसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांवर भाष्य करताना, सोशल मीडियामुळे पसरत असलेल्या अपप्रचार आणि दिशाभूल यापासून पत्रकारांनी सजग राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
प्रकाशित करण्यात आलेल्या दिनदर्शिकेत सामाजिक प्रबोधन, ऐतिहासिक दिनविशेष, थोर महापुरुषांचे विचार, पत्रकारितेची मूल्ये आणि प्रेरणादायी संदेश यांचा समावेश करण्यात आला असून, ही दिनदर्शिका केवळ तारखा दाखवणारी नसून समाजाला दिशा देणारी ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. दिनदर्शिकेच्या दर्जेदार मांडणीचे विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले. उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष दिनकर पवार यांनी संघाच्या आगामी उपक्रमांची माहिती देत, मराठी दक्ष पत्रकार संघ समाजासाठी, सत्यासाठी आणि निर्भीड पत्रकारितेसाठी सातत्याने कार्यरत राहील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
हा सोहळा केवळ दिनदर्शिकेच्या प्रकाशनापुरता मर्यादित न राहता, सत्य, सामाजिक भान आणि पत्रकारितेच्या मूल्यांचा जागर करणारा प्रभावी संदेश देणारा कार्यक्रम ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default