देशाच्या सुरक्षेचा कणा मानल्या जाणाऱ्या लष्करी छावणीपर्यंत थेट अमली पदार्थांचा विळखा पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात उघडकीस आला आहे. देवळाली कॅम्प येथील लष्करी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच २४ लाख रुपये किमतीचे घातक ‘ॲम्फेटामाइन’ हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
शहर व जिल्ह्यात मॅफेड्रॉन (एमडी), गांजा, गुटखा यांची खुलेआम तस्करी सुरू असतानाच आता थेट लष्करी तळालगत ‘हायडोस’ नशेचा साठा सापडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ एक ग्रॅम ॲम्फेटामाइन सुमारे पाच हजार रुपयांना विकले जात असून प्रतिकिलो तब्बल पन्नास लाख रुपयांच्या दराने हा घातक पदार्थ चोरीछुपे बाजारात पोहोचवला जातो.
देवळाली कॅम्प पोलिस व अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) गुरुवारी (दि. ८) पहाटे पाचच्या सुमारास लष्करी प्रवेशद्वारासमोरील कॅथे कॉलनीत छापा टाकला. या कारवाईदरम्यान एका लेबर रूममधून गांजा व ॲम्फेटामाइनचा मोठा साठा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुन्ना कल्लू कोल (४०), शांती मुन्ना कोल (३३) व अमर मुन्ना कोल (१९, सर्व रा. सतना, मध्य प्रदेश) या तिघांना अटक केली.
अटक केलेले संशयित मजुरीचे काम करत असून काही महिन्यांपासून देवळाली कॅम्प परिसरात वास्तव्यास होते. त्यांनी यापूर्वी लष्करी कार्यालयात मजुरीचे काम केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे या अमली पदार्थांचा पुरवठा लष्करी छावणीतील काही जवानांपर्यंत पोहोचला असावा, असा गंभीर संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान लष्करातील काही अधिकाऱ्यांना अमली पदार्थ जवानांपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पोलीस उपायुक्तांना कळवले. त्यानंतर देवळाली कॅम्पचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली एनडीपीएस कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील अंमलदार राजेंद्र गुंजाळ यांनी फिर्याद दिली असून आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थांचा स्रोत, पुरवठा साखळी आणि लष्करी छावणीतील संभाव्य संपर्क यांचा सखोल तपास सुरू असून पुढील कारवाईत आणखी मोठी नावे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या लष्करी परिसरात नशेचा शिरकाव झाल्याचा हा प्रकार केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठीही गंभीर इशारा मानला जात आहे.
