वडिलोपार्जित शेती नावावर करून देण्याच्या वादातून रक्ताच्या नात्यांनाच काळिमा फासणारी धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील काळखेडा गावात घडली आहे. मध्यरात्रीच्या अंधारात एका मुलाने स्वतःच्या आईचा गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तर आईला वाचविण्यासाठी पुढे आलेल्या लहान भावाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आठ जानेवारी रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. देविदास सुकलाल पाटील (रा. काळखेडा, ता. धुळे) हा वडिलोपार्जित शेती आपल्या नावावर करून द्यावी, या मागणीसाठी घराबाहेर येऊन शिवीगाळ व आरडाओरड करू लागला. घरात झोपेत असलेल्या आई मीराबाई सुकलाल पाटील आणि धाकटा भाऊ प्रशांत सुकलाल पाटील (वय ३८) बाहेर आले असता वाद अधिक चिघळला.
वादाचे रूपांतर क्षणात हिंसाचारात झाले. संतापाच्या भरात देविदासने आई मीराबाई यांचा गळा आवळून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. आईला वाचविण्यासाठी प्रशांत पाटील पुढे सरसावताच देविदासने चाकू काढून त्याच्यावर हल्ला केला. पोटावर आणि पाठीवर वार करण्याचा प्रयत्न टाळण्यात प्रशांत यशस्वी झाला, मात्र त्यानंतर देविदासने थेट प्रशांतच्या गळ्यावर चाकूने वार केला. या हल्ल्यात प्रशांत गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर जखमी प्रशांत पाटील यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशांत पाटील यांच्या फिर्यादीवरून देविदास पाटील याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.
या घटनेमुळे काळखेडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादातून आई-मुलगा आणि भावाभावांमध्येही इतका टोकाचा हिंसाचार होऊ शकतो, यामुळे नागरिकांमध्ये भीती व संताप व्यक्त होत आहे. कौटुंबिक वाद, मालमत्तेचे हेवे-दावे आणि वाढता तणाव यामुळे नातेसंबंधांमध्ये दरी निर्माण होत असल्याचे पुन्हा एकदा या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड यांनी सांगितले की, देविदास पाटील याने आईचा गळा आवळण्याचा तसेच प्रशांत पाटील याच्यावर चाकूने वार केल्याचा गंभीर आरोप फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमीचा वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
