तालुक्यातील टेकवाडे येथील आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता संस्कार, संस्कृती आणि व्यावसायिक कौशल्यांचे प्रत्यक्ष धडे देणारा अनोखा उपक्रम साकार झाला. आनंदमेळा, मातृपद पूजन आणि हळदी-कुंकू अशा त्रिवेणी कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेचे संपूर्ण वातावरण भावनिक, आनंदी आणि प्रेरणादायी झाले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मातृपद पूजनाने झाली. शाळेतील तब्बल ८५ माता-पालकांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे पाय धुऊन, पूजा करून चरणी मस्तक टेकवत आशीर्वाद घेतले. यावेळी विद्यार्थ्यांनी दररोज आई-वडिलांच्या पाया पडण्याची शपथ घेतली. आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा हा सोहळा पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. संस्कारांची खरी शिकवण या क्षणी प्रत्यक्ष अनुभवता आली.
संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संगीत खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे, बुक बॅलन्स, रांगोळी अशा विविध स्पर्धांनी वातावरणात चैतन्य भरले. विजेत्या महिला पालकांचा शाळेच्या वतीने बक्षिसे व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी तापीराम पावरा, केंद्रप्रमुख किशोर गाडीलोहार, मुख्याध्यापक किशोर सोनवणे, सरपंच बारकू धनगर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोतीलाल पटेल यांच्यासह विजय चौधरी, दुर्गेश पटेल, तसेच फुले शाहू आंबेडकर वृत्तपत्रचे संपादक रमेश मोतिराम ईशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर सोनवणे यांनी केले, सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले तर आभार अनिल माळी यांनी मानले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरला आनंदमेळा. विद्यार्थ्यांनी व पालकांनी मिळून तयार केलेल्या ४८ खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनी शाळेचे आवार गजबजून गेले होते. पोंगा-बटाटे, भेळपुरी, समोसा, वडापाव यांसारख्या पदार्थांना मोठी मागणी होती. प्रत्येक पदार्थाची किंमत अवघी पाच रुपये ठेवण्यात आली होती. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, नियोजन, विक्री आणि बचतीचे प्रत्यक्ष धडे मिळाले. विशेष म्हणजे अल्पावधीतच या आनंदमेळ्यात जवळपास सात हजार रुपयांची उलाढाल झाली.
संस्कारांची बीजं रुजवताना विद्यार्थ्यांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवणारा हा उपक्रम पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या कौतुकाचा विषय ठरला. “शिक्षण म्हणजे केवळ अभ्यास नव्हे, तर जीवन जगण्याची कला आहे,” हेच या कार्यक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

