नवर्‍याच्या कथित विवाहबाह्य संबंधांनी भाग्यश्री खचून गेली! अखेर गळफास… शहादा हादरलं

फुले शाहू आंबेडकर
0
शहादा / प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली असून, शहादा शहरात एका तरुण विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सततच्या मानसिक त्रासाने खचून गेलेल्या भाग्यश्री गौरव चौधरी (वय २९) हिने सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरात जीवन संपवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
ही घटना शहादा शहरातील रमकूबाईनगर परिसरात १२ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास घडली. भाग्यश्री ही विवाहित असून, तिचा पती गौरव चौधरी याचे कथित विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय तिला होता. याच कारणामुळे ती मानसिक तणावाखाली होती, असा आरोप तिच्या माहेरच्या कुटुंबीयांनी केला आहे.
भाग्यश्रीचे वडील सुनील बन्सी चौधरी यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, पतीच्या वर्तनामुळे आणि संशयास्पद संबंधांमुळे भाग्यश्री गेल्या काही काळापासून अस्वस्थ होती. तिने अनेकदा आपली व्यथा माहेरच्यांना सांगितली होती. मात्र परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने ती पूर्णपणे खचून गेली आणि अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात नेमकं काय निष्पन्न होतं, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या घटनेनंतर मयत भाग्यश्रीच्या आई-वडिलांचा आणि नातेवाईकांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. तरुण वयात संसार उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपासाची दिशा अधिक खोलात नेली आहे. कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, मृत विवाहितेचा मोबाईल कॉल रेकॉर्ड, संदेश, तसेच घरातील परिस्थितीची सखोल पाहणी केली जात आहे. प्राथमिक तपास पूर्ण झाल्यानंतर आवश्यक त्या कायदेशीर कलमांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
एका तरुण विवाहितेचा संशयास्पद परिस्थितीत झालेला हा मृत्यू आत्महत्या की आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार, याचे उत्तर आता पोलिस तपासातूनच समोर येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default