धुळे शहरातील गुरुद्वारा परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या रणविरसिंग सुखदेवसिंग खालसा याच्या निवासस्थानातून देशी बनावटीचे पिस्टल, रायफल, जिवंत काडतुसे व मॅगझिन असा बेकायदेशीर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण पाच लाख सात हजार रुपये किमतीची शस्त्रे हस्तगत करण्यात आल्याने शहराच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यासंदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात १० जानेवारी २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी रणविरसिंग सुखदेवसिंग खालसा (वय ३६), रा. गुरुद्वारा, गुरुनानक साहेब परिसर, मुंबई–आग्रा रोड, धुळे (मूळ रा. रावतसर, जिल्हा हनुमानगढ, राजस्थान) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी गुरुद्वारा परिसरातील त्याच्या निवासस्थानाची झडती घेतली असता बेकायदेशीररित्या ठेवलेली जिवंत काडतुसे व मॅगझिन आढळून आली. तपास अधिक खोलवर नेत असताना आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपीकडून आणखी बेकायदेशीर अग्निशस्त्रे व मॅगझिन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
जप्त शस्त्रांमध्ये सुमारे चार लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची पिस्टल असून त्यावर “Malhotra Sons Defence – MSD Guardian” असे नमूद आहे. हे पिस्टल ३५ बोअरचे, भारतात निर्मित असून त्यावर विशिष्ट क्रमांक आढळून आला आहे. याशिवाय पाच हजार रुपये किमतीचे स्टीलचे मॅगझिन, एक लाख रुपये किमतीची ३१५ बोअरची स्पोर्ट रायफल (काळी लोखंडी बॅरल, तपकिरी बॉडी व बट), तसेच दोन हजार रुपये किमतीचे लोखंडी मॅगझिन जप्त करण्यात आले आहे. सर्व शस्त्रांची एकूण किंमत पाच लाख सात हजार रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके करीत असून, या शस्त्रांचा वापर नेमका कशासाठी होणार होता, यामागे कोणते गुन्हेगारी जाळे आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे व पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहरात बेकायदेशीर शस्त्रसाठा, गुन्हेगारी कारवाया व समाजविघातक प्रवृत्तीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जात असून, या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
