घरावर दगडफेक, खुर्च्यांची तोडफोड
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञात व्यक्तींनी ऋषिकेश पाटील यांच्या घरावर अचानक दगडफेक करत घरासमोरील खुर्च्या व साहित्याची तोडफोड केली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपवर थेट आरोप
या घटनेनंतर शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख मनोज मोरे यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, हा हल्ला नियोजित असून भाजप उमेदवार प्रभावती शिंदे यांचे पती विलास शिंदे व त्यांच्या समर्थकांनी दहशत निर्माण करण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याचा गंभीर आरोप केला आहे.
“मतदानापूर्वी विरोधकांना घाबरवण्याचा हा प्रयत्न असून, लोकशाहीला काळिमा फासणारा प्रकार आहे,” असे मोरे यांनी सांगितले.
देवपूर पोलिस घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला असून, दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
500 हून अधिक मतदान कार्डांचा संशय
दरम्यान, आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, एका कार्यकर्त्याकडे तब्बल 500 पेक्षा अधिक मतदान कार्ड आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या घटनेमुळे निवडणूक प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, संभाव्य गैरप्रकाराबाबत चर्चा रंगली आहे.
मतदानाच्या दिवशी कडक बंदोबस्त
उद्या धुळे महानगरपालिकेसाठी मतदान होत असून, या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले
या घटनेमुळे निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस वादळी ठरला असून, राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी धुळे शहरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले आहे. पुढील काही तासांत या प्रकरणावर पोलिस व निवडणूक प्रशासनाची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
