“अखेरच्या ३ मिनिटांत राजकीय थरार! शिंदेसेनेच्या ‘फिल्डिंग’ने माघार थांबली; धुळे मनपात ७४ जागांसाठी ३१६ उमेदवार मैदानात”

फुले शाहू आंबेडकर
0
धुळे : प्रतिनिधी -  महानगर पालिका निवडणुकीच्या रिंगणात अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी राजकारणाने अक्षरशः थरारक वळण घेतले. शुक्रवारी तब्बल १९९ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता ७४ जागांसाठी ३१६ उमेदवार निवडणूक मैदानात उरले आहेत. या गदारोळात भाजपने चार जागा बिनविरोध जिंकत आपली ताकद दाखवली असली, तरी पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यात पक्षाला पूर्ण यश मिळाले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, अर्ज माघारीच्या अखेरच्या क्षणांत घडलेल्या एका नाट्यमय घटनेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या ‘फिल्डिंग’मुळे एका उमेदवाराची माघार अक्षरशः तीन मिनिटांत रोखली गेली, ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
भाजपची बिनविरोध बाजी, तरी अंतर्गत धुसफूस
निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच भाजपने रणनीतीने हालचाली करत आघाडी घेतली. शुक्रवारी प्रभाग १७ ‘अ’ मधून अमोल पावबा मासुळे यांनी बिनविरोध विजय मिळवला. त्यांच्या रूपाने भाजपचे आतापर्यंत चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या विजयावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
मात्र, बिनविरोध यश मिळत असतानाच भाजपमध्ये काही ठिकाणी असंतोष आणि बंडखोरीचे सूर दबक्या आवाजात ऐकू येत असल्याचेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
अखेरच्या ३ मिनिटांत ‘हुकली’ माघार
संपूर्ण दिवसात सर्वाधिक चर्चेत राहिली ती प्रभाग क्रमांक ८ मधील घटना. अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवरून सोनाली सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्या अर्ज माघे घेणार असल्याची माहिती शिंदेसेनेच्या महानगरप्रमुख संजय वाल्हे आणि पदाधिकारी आनंद लोंढे यांना मिळाली.
अर्ज माघारीची अंतिम मुदत दुपारी ३ वाजेपर्यंत होती. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना सोनाली सोनवणे आणि त्यांचे पती प्रवीण सोनवणे जुन्या मनपा निवडणूक कार्यालयाकडे निघाल्याची खबर मिळताच वाल्हे आणि लोंढे यांनी धाव घेतली.
प्रश्नांचा भडिमार, वेळ संपली… आणि खेळ पालटला
अर्ज माघारीसाठी अवघ्या ३ मिनिटांचा कालावधी उरलेला असताना, पदाधिकाऱ्यांनी थेट उमेदवार आणि त्यांच्या पतीसमोर सवालांचा भडिमार सुरू केला.
“माघार का घेताय?”, “नेमकं कारण काय?”, “दबावाखाली आहात का?” अशा प्रश्नांमुळे तिथे चांगलाच तणाव निर्माण झाला. दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या चर्चेत, विनवण्यांत आणि आरोप-प्रत्यारोपांत माघारीची मुदत संपली.
परिणामी, सोनाली सोनवणे यांचा अर्ज कायम राहिला आणि त्या शिंदेसेनेच्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या. अखेरच्या क्षणी घडलेल्या या राजकीय खेळीमुळे निवडणुकीतील समीकरणे बदलली असून, शहरभर चर्चेचे वादळ उठले आहे.
निवडणूक तापली, राजकीय संघर्ष तीव्र
धुळे महानगरपालिकेची ही निवडणूक आता केवळ विकासाच्या मुद्द्यांपुरती मर्यादित न राहता, डावपेच, फिल्डिंग आणि अखेरच्या क्षणांतील थरार यामुळे अधिकच चुरशीची होत चालली आहे. येत्या काळात प्रचारात आणखी कोणते राजकीय स्फोट होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default