नाशिक शहरातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली असून, एका २१ वर्षीय जन्मतः दिव्यांग तरुणीने आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दीक्षा त्रिभुवन असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून, आत्महत्येपूर्वी तिने आपल्या तळहातावर पालकांसाठी लिहिलेला शेवटचा संदेश पाहून पोलीस आणि नातेवाईकही हेलावून गेले आहेत.
गंगापूर रोड परिसरातील एका वस्तीमध्ये ही घटना घडली. रविवारी सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास दीक्षा घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. कुटुंबीयांनी तिला तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
शवविच्छेदन प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या निदर्शनास एक धक्कादायक बाब आली. दीक्षाच्या उजव्या तळहातावर इंग्रजीत “Sorry, I Love You Mom-Dad” असे लिहिलेले आढळून आले. आपल्या लाडक्या लेकीचा हा शेवटचा निरोप पाहताच पालकांनी रुग्णालयातच आक्रोश केला. उपस्थितांचेही डोळे पाणावले.
जिद्दीने जगणारी दीक्षा… पण मनातले वादळ कुणालाच कळले नाही
दीक्षा ही जन्मतःच दिव्यांग होती. शहरातील एका दिव्यांग शाळेत ती शिक्षण घेत होती. स्वभावाने अत्यंत शांत, अबोल आणि मिळूनमिसळून वागणारी अशी तिची ओळख होती. आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करत शिक्षण घेणाऱ्या दीक्षाबद्दल कुटुंबीयांना मोठ्या अपेक्षा होत्या. तिचं भविष्य उज्ज्वल असेल, असा विश्वास पालक व्यक्त करत होते.
मात्र, या शांत स्वभावामागे नेमके कोणते मानसिक दडपण होते, कोणती वेदना ती एकटीच सहन करत होती, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. घरातून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नसल्याने आत्महत्येमागील कारण गूढच आहे.
पोलिस तपास सुरू; शाळा आणि मित्रमंडळींकडून माहिती घेणार
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तपास करत आहे. दीक्षाच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्यात आले असून, तिच्या शाळेतील शिक्षक, मित्रमैत्रिणी तसेच परिचितांकडून चौकशी केली जाण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
कोणताही संशयास्पद प्रकार आढळून आलेला नसला, तरी सर्व बाजूंनी तपास केला जात असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
एकीकडे “स्वतःशी झुंज देत शिक्षण घेणारी दिव्यांग मुलगी” आणि दुसरीकडे तिचा हातावर लिहिलेला शेवटचा संदेश — या घटनेने नाशिक शहराला अक्षरशः हादरवून सोडले आहे.
