कामटवाडा परिसरात नगरसेवकांचे नाव घेत टवाळखोरांनी उघडपणे दहशत माजवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाण, विनयभंग, धमक्या आणि त्यानंतर न्याय न मिळाल्याने थेट आत्मदहनाचा प्रयत्न — या साऱ्या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
रविवारी रात्री एका किरकोळ भांडणाचा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने अचानक हल्ला केला. “आम्ही नुकतेच निवडून आलेले नगरसेवक मुकेश शहाणे व विनोद मगर यांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही मर्डरही केला आहे, आम्हाला कोणाचीच भीती नाही,” अशी दहशत निर्माण करणारी भाषा वापरत टोळक्याने युवकाला बेदम मारहाण केली. यावेळी युवकाची पत्नी मध्ये पडताच तिच्यावरही हात उचलत तिचा विनयभंग करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
घटनेदरम्यान परिसरातील नागरिकांनी धाव घेत हस्तक्षेप केल्याने दोघांना टोळक्याच्या तावडीतून सोडवण्यात आले. त्यानंतर जखमी पती-पत्नी अंबड पोलीस ठाण्यात दाखल झाले. मात्र पोलिसांनी प्रथम उपचारासाठी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. युवकाच्या आईने तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन सुनेचा जबाब नोंदविण्याचा प्रयत्न केला असता, डॉक्टरांनी ती जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे सांगितल्याने प्रक्रिया रखडली.
न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून दुसऱ्याच दिवशी सोमवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास युवकाच्या आईने दिव्या कार्निवाल थिएटर चौफुलीवर थेट स्वतःवर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी व नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. हा थरारक प्रकार पाहून परिसरात एकच खळबळ उडाली.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नगरसेवक मुकेश शहाणे यांनी नुकत्याच लागलेल्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा केला असून, पोलीस खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
मात्र, नगरसेवकांचे नाव घेत एका महिलेला मारहाण व विनयभंग करण्याचे धाडस करणाऱ्या संशयितांमुळे पोलीस यंत्रणेसमोर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस आयुक्तांनी राबविलेल्या ‘कायद्याच्या बालेकिल्ल्या’च्या संकल्पनेलाच या घटनेने थेट आव्हान दिल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.
या प्रकरणात तातडीने ठोस कारवाई होत नाही, तर नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामटवाड्यातील ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर इशारा मानली जात आहे.
