अनैतिक संबंधांना कंटाळून एका महिलेने आपल्या सख्ख्या मुलाच्या मदतीने तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, ग्रामीण पोलिसांनी संशयित माय-लेकास अटक केली आहे.
जंगलात आढळला संशयास्पद मृतदेह
दि. १३ जानेवारी २०२६ रोजी जामडी फॉरेस्ट शिवारात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था, घटनास्थळी पडलेली तुटलेली चप्पल, फुटलेला मोबाईल आणि वेगवेगळ्या ठिकाणी पडलेली अंडरवेअर पाहता हा प्रकार अपघात नसून निर्घृण खून असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले होते.
तपासात मृताची ओळख राजू रामचंद्र पवार (रा. जामडी तांडा) अशी पटली.
५० संशयितांची चौकशी, पण धागा लागत नव्हता
या खुनाचा तपास कन्नड ग्रामीण पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाकडून सुरू होता. सलग आठ दिवस ५० हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागत नव्हता.
मात्र राजू पवार हे बंजारा समाजातील असल्याने पोलिसांनी त्या समाजातील व्यक्तींवर लक्ष केंद्रित केले. याच चौकशीतून एका महिलेकडे संशयाची सुई वळली.
अनैतिक संबंध आणि रक्तरंजित कट
पोलिसांनी संशयित महिलेला व तिच्या मुलाला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशीतून थरकाप उडवणारी कबुली समोर आली.
राजू पवार यांच्याशी असलेल्या अनैतिक संबंधांमुळे महिला त्रस्त झाली होती. या नात्याला कायमची पूर्णविराम देण्यासाठी तिने आपल्या सख्ख्या मुलाच्या मदतीने राजूचा खून करण्याचा कट रचला, असे तपासात निष्पन्न झाले.
माय-लेक अटकेत, ७ दिवसांची पोलीस कोठडी
दि. २० जानेवारीच्या रात्री पोलिसांनी संशयित माय-लेकांना अटक केली. बुधवारी त्यांना कन्नड न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने दोघांना ७ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.
खुनामागे आणखी कोणी? तपास सुरूच
हा खून केवळ दोघांच्याच कटातून झाला की यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनास्थळी सापडलेले साहित्य, मोबाईल डेटा आणि कॉल रेकॉर्डच्या आधारे तपासाची दिशा अधिक तीव्र करण्यात आली आहे.
अनैतिक संबंध, आईचा निर्णय आणि मुलाचा सहभाग… या घटनेने समाजाला हादरवून सोडलं असून, जामडी तांड्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
