शिरपूर तालुक्यातील थाळनेर व नागेश्वर परिसरासह अहिल्यापुर, वाठोडा, भाटपुरा, सावरगोडी, नागेश्वर बंगला, अजनाड, तरडी, बभळाज आदी शिवारांमध्ये गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. शेतशिवारात उभी असलेली मका, गहू, रब्बी ज्वारी, हरभरा ही पिके गारांच्या माऱ्याने अक्षरशः चिरडून गेली. अनेक ठिकाणी पिकांची कणसे व दाणे जमिनीवर पडले असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वादळी वाऱ्यामुळे मका, ज्वारी व गहू पिके मोठ्या प्रमाणावर आडवी पडली आहेत. केळी व पपईच्या बागांमध्येही प्रचंड नुकसान झाले असून अनेक झाडे मोडून जमिनीवर कोसळली आहेत. काही शेतकऱ्यांच्या बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. गारपिटीमुळे पानं व फळांवर खोल जखमा झाल्याने पुढील काळात बुरशीजन्य रोग पसरण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या अवकाळी गारपिटीचा परिणाम केवळ शेतीपुरताच मर्यादित राहिला नाही. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली, तर काही भागांत वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. विजेच्या तारा तुटल्याने अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. शेतातील बांध, ताटे, ठिबक सिंचन यंत्रणा व पाईपलाईनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी नुकसानग्रस्त भागात दाखल झाले असून प्राथमिक पाहणी व माहिती संकलनास सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच पंचनामे पूर्ण करून सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, यापूर्वीच्या अनुभवांवरून केवळ पाहणीपुरतीच कारवाई न होता शेतकऱ्यांना तातडीने प्रत्यक्ष मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला असला तरी प्रत्यक्षात भरपाई मिळण्यास मोठा विलंब होत असल्याचा अनुभव असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावेळी विमा कंपन्यांनी तातडीने शेतशिवारांची पाहणी करून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुलभ व जलद करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. आधीच वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर या गारपिटीने मोठे संकट ओढावले आहे.
गारपिटीनंतर पिकांवर रोगराई पसरू नये यासाठी कृषी तज्ज्ञांनी तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणीही पुढे येत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास पुढील नुकसान वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निसर्गाच्या या अचानक आलेल्या कहरामुळे शिरपूर तालुक्यातील शेतकरी हतबल झाला असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी जोरदार मागणी संपूर्ण तालुक्यातून होत आहे.
