‘महसूल’ नियमांना केराची टोपली दाखवत वाळू उपसाच्या नावाखाली मनमानी कारभार करणाऱ्या वन अधिकाऱ्यांचा बुरखा अखेर फाटला आहे. जप्त हायवा डंपर सोडण्यासाठी तब्बल ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्र्यंबक तालुक्यातील हरसूल वनपरिक्षेत्र अधिकारी (रेंजर) आणि वनपालाला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे वन विभागात खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये कैलास नवनाथ सोनवणे (रा. नाथकृपा, बिस्तबाग, महलजवळ, तपोवन रोड, अहिल्यानगर) हे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि सुनील बाळासाहेब टोंगारे (रा. देवश्री, ए. टी. पवार आश्रमशाळेजवळ, बोरगड, म्हसरूळ, नाशिक) हा वनपाल यांचा समावेश आहे. दोघांनाही नाशिक न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
वाळू उपसा, गुन्हा आणि लाचेची मागणी
तक्रारदाराच्या हायवा डंपरवर बेकायदा वाळू उपसा केल्याचा ठपका ठेवत वन गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र हा गुन्हा ‘सेटल’ करून जप्त डंपर सोडण्यासाठी सोनवणेने टोंगारेच्या संगनमताने ३५ हजारांची थेट मागणी केल्याचा आरोप आहे. वैतागलेल्या तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे धाव घेतली आणि सापळ्याची आखणी झाली.
कार्यालयातच रंगेहाथ अटक
शुक्रवारी (दि. २) रात्री हरसूल वनपरिक्षेत्र कार्यालयात एसीबीच्या पथकाने सापळा रचत दोघांनाही लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. शनिवारी (दि. ३) त्यांना नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी व बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद झाला. लाचेचे कारण, वनगुन्हा नोंदवण्याचा अधिकार, मनमानी दंड आकारणी आदी मुद्द्यांवर न्यायालयात खडाजंगी झाली. तपासाची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केली.
घरझडतीत ‘संपत्तीचा स्फोट’
अटकेनंतर नाशिक व अहिल्यानगर येथील पथकांनी दोघांच्या घरांवर झडती टाकली. त्यात कार, दुचाकी, स्कूटी, मोपेड तसेच फ्लॅट व रो-हाऊस स्वरूपातील स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली.
सोनवणे याच्याकडून अहिल्यानगरमधील नाथकृपा रो-हाऊस, एस्क्रॉस कार, दुचाकी व स्कूटी
टोंगारे याच्याकडून किया कार, दुचाकी आणि निवासी फ्लॅट
अशी मालमत्ता ताब्यात घेण्यात आली आहे.
उघड चौकशीचा फास आवळणार
या प्रकरणाचा तपास नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक अतुल चौधरी करत असून, उत्पन्नाच्या स्त्रोतांबाबत उघड चौकशी होण्याची दाट शक्यता आहे. वनगुन्ह्यांच्या नावाखाली वसुलीचे आणखी प्रकार उघडकीस येण्याची शक्यता एसीबीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
वन खात्यातील लाचखोरीवर एसीबीचा करारा घाव बसला असून, ‘वाळू’च्या नावाखाली सुरू असलेल्या मनमानी कारभाराला हा मोठा धक्का मानला जात आहे.
