शिक्षक म्हणजे संस्कार, शिस्त आणि सुरक्षिततेचा आधारस्तंभ मानला जातो. मात्र नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने या विश्वासालाच तडा दिला आहे. ‘ऑल इज वेल’सारख्या सकारात्मक वाक्याचा गैरवापर करत खाजगी क्लासच्या शिक्षकाने १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
शहादा येथील ‘प्रवक्ता अकॅडमी’ (पूर्वीची शितल अकॅडमी) मध्ये दि. २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ही घटना घडल्याचे तक्रारीत नमूद आहे. संशयित शिक्षक योगेश अरुण शेंडे याने स्पेलिंग पाठांतराच्या बहाण्याने विद्यार्थिनीला ऑफिसमध्ये बोलावले. त्यानंतर “ऑल इज वेल कसे बोलतात ते आठव” असे म्हणत गोंजारण्याच्या नावाखाली तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, शिक्षकाने जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. पीडितेने तीव्र विरोध केला असतानाही त्याने पुन्हा पाठीमागून पकडून शरीरसुखाचा प्रयत्न केला. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच विद्यार्थिनीने धैर्य दाखवत स्वतःची सुटका करून घेतली आणि तिथून पळ काढला. या घटनेने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
विशेष म्हणजे, अवघ्या महिन्याभरापूर्वीच या अकॅडमीचे नामांतर करून नव्या स्वरूपात सुरुवात करण्यात आली होती. इंग्रजी शिक्षणाच्या नावाखाली संशयास्पद प्रकार सुरू असल्याचा आरोप करत नागरिकांनी अकॅडमीची सखोल चौकशी करून ती तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. केवळ गुन्हा दाखल करून थांबू नये, तर आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी भावना व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून शहादा पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो (POCSO) कायदा तसेच ॲट्रॉसिटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निलेश देसले करत आहेत.
