संस्कारांची शिदोरी देणारे स्नेहसंमेलन; टेकवाडे आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत संस्कृतीचा जागर

फुले शाहू आंबेडकर
0
खामखेडा (प्र.था) / प्रतिनिधी :  मोबाईलच्या युगात हरवत चाललेली संस्कृती, विस्मरणात जाणारे संस्कार आणि नव्या पिढीसमोर उभे असलेले आव्हान… या पार्श्वभूमीवर टेकवाडे येथील आर. सी. पटेल प्राथमिक शाळेत पार पडलेल्या स्नेहसंमेलनाने पालकांसह मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले. ‘संस्कार शिदोरी’ या संकल्पनेवर आधारित या स्नेहसंमेलनातून चिमुकल्यांनी गीत, नृत्य आणि नाटिकांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे मोल अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन गटशिक्षणाधिकारी डॉ. नीता सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, शिक्षण विस्तार अधिकारी तापीराम पावरा, केंद्रप्रमुख किशोर गाडीलोहार, समता परिषदेचे अध्यक्ष रविंद्र माळी, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, खामखेड्याचे सरपंच बारकु लहू धनगर, टेंभे सरपंच देवीसिंग राजपूत, माजी सरपंच मंगलाबाई धनगर, पोलीस पाटील अतुल शिरसाठ यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्नेहसंमेलनाची सुरुवात ‘शिवकन्या’ या छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीताने झाली. या सादरीकरणाने उपस्थितांमध्ये इतिहासाची जाणीव आणि अभिमान जागवला. ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारे ‘वासुदेव आला हो वासुदेव आला’ हे गीत, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे ‘जातीचे शेतकरी’ गीत, देशभक्तीने भारावून टाकणारे ‘जलवा जलवा’ तसेच ‘मी मराठी’ या गीतातून माय मराठीचे महत्त्व ठळकपणे अधोरेखित झाले.
कार्यक्रमाचा कळस ठरली सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘सावित्री’ ही नाटिका. अंधश्रद्धेवर घणाघाती प्रहार करत स्त्री शिक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडले. नाटिकेदरम्यान अनेक पालकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नीता सोनवणे म्हणाल्या, “आज सर्व सुविधा असूनही आपण संस्कार विसरत चाललो आहोत. मोबाईलच्या आहारी गेलेल्या जीवनशैलीतून बाहेर पडण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे. या चिमुकल्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई, महात्मा फुले, रमाबाई यांचे विचार गीत-नाट्यांतून जिवंत केले. संस्कार हीच खरी संपत्ती आहे.”
स्नेहसंमेलनाला टेकवाडे, भरवाडे, टेंभे, खामखेडा परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती. विशेषतः महिला पालकांची गर्दी लक्षणीय ठरली. मुख्याध्यापक किशोर सोनवणे यांनी प्रास्ताविकात शाळेच्या वर्षभरातील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांचा आढावा मांडला. सूत्रसंचलन महेंद्र माळी यांनी केले तर आभार अनिल माळी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत चौधरी, श्रीराम पाटील, भाईदास पावरा, श्वेता धनगर, ज्ञानेश्वर वारुळे आदी शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
संस्कारांची शिदोरी देणारे हे स्नेहसंमेलन उपस्थितांच्या मनावर खोलवर ठसा उमटवून गेले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default