महावितरणच्या गंभीर निष्काळजीपणामुळे म्हसावद येथे घडलेली घटना केवळ प्रशासनिक चूक न राहता थेट मानवी जीव घेणारी दुर्घटना ठरली आहे. वीज बिल भरलेले असतानाही महावितरणने चुकून एका खाजगी रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला. परिणामी रुग्णालयातील ऑक्सिजन यंत्रणा बंद पडली आणि ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या इस्लामुद्दीन नझरुद्दीन लोहार (रा. म्हसावद) या वृद्धाचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता महावितरणने संबंधित खाजगी रुग्णालयाची वीज अचानक कापली. विशेष म्हणजे रुग्णालयाचे सर्व वीज बिल भरलेले असतानाही “चुकून दुसऱ्याच्या ऐवजी” वीज कापण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. वीज गेल्याबरोबर रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा ठप्प झाला. त्याचवेळी इस्लामुद्दीन लोहार यांच्यावर ऑक्सिजनवर उपचार सुरू होते. वीजपुरवठा तातडीने सुरू न झाल्याने त्यांना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन मिळू शकला नाही. रात्रभर ऑक्सिजनचा प्रश्न कायम राहिल्याने गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. वीज नसल्याने डॉक्टर व कर्मचाऱ्यांना अक्षरशः रस्त्यावर रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली. काही रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने शहादा येथे हलवण्यात आले, तर काही रुग्णांवर सध्या दुसऱ्यांकडून तात्पुरता वीजपुरवठा घेऊन उपचार सुरू आहेत.
परिस्थिती अधिक गंभीर ठरण्याचे कारण म्हणजे, म्हसावद येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत बांधकामात असून ते सध्या राणीपूर येथे स्थलांतरित आहे. त्यामुळे म्हसावद व परिसरातील जवळपास ५० किलोमीटरपर्यंत एकही शासकीय रुग्णालय उपलब्ध नाही. नागरिकांना पूर्णपणे खाजगी रुग्णालयांवरच अवलंबून राहावे लागत असताना महावितरणकडून झालेली ही कारवाई अत्यंत बेजबाबदार असून थेट रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारी असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, रुग्णालयाचे डॉक्टर श्रीराम पाटील यांनी संताप व्यक्त करताना सांगितले,
“वीज बिल भरूनही आमच्या रुग्णालयाचा वीजपुरवठा कापण्यात आला. ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव धोक्यात आला. वीज नसल्याने आम्हाला रुग्णांना उघड्यावर उपचार द्यावे लागले. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि असह्य आहे.”
घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी महावितरण व प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यात आला नाही, असा आरोपही करण्यात येत आहे. ग्रामीण भागात वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
प्रश्न कायम…
ही केवळ “चूक” होती की महावितरणची अक्षम्य निष्काळजीपणा?
एका वृद्धाचा जीव गेल्यानंतर तरी जबाबदारी निश्चित होणार का, की हा प्रकारही फक्त फाईलीतच दफन होणार—असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत.
