उत्तर महाराष्ट्राच्या रेल्वे नकाशावर मोठा बदल घडवणारी, धुळेकरांच्या वर्षानुवर्षांच्या अपेक्षांना वाट मोकळी करून देणारी धुळे–पुणे (मनमाड–दौंड मार्गे) थेट एक्सप्रेस आणि धुळे–मुंबई रात्रीची नियमित एक्सप्रेस सुरू करण्यात यावी, अशी जोरदार व आक्रमक मागणी आता पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण आणि प्रवासी संघटनांनी या मागणीसाठी आवाज बुलंद केला असून, रेल्वे प्रशासनावर दबाव वाढत आहे.
सध्या धुळे रेल्वे स्थानकावरून मुंबईसाठी फक्त सकाळी साडेसहा वाजता सुटणारी एकमेव एक्सप्रेस उपलब्ध आहे. मात्र, रात्रीची थेट एक्सप्रेस नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. पुण्याचा तर प्रश्नच गंभीर आहे. धुळेहून पुण्याला जायचे असेल, तर प्रवाशांना चाळीसगाव किंवा मनमाड गाठून गाडी बदलावी लागते, त्यातच फलाट बदल, जिने, दादरे चढणे–उतरणे, वेळेचा अपव्यय आणि वाढलेला खर्च यामुळे विशेषतः वृद्ध, महिला आणि रुग्ण प्रवाशांचे हाल होत आहेत.
थेट गाडी म्हणजे दिलासा!
धुळे–पुणे व्हाया मनमाड–दौंड थेट एक्सप्रेस सुरू झाल्यास उत्तर महाराष्ट्राला थेट पुणे, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा मजबूत रेल्वे दुवा निर्माण होणार आहे. धुळे हे औद्योगिक, शैक्षणिक व व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून, दररोज शेकडो विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक आणि रुग्ण मुंबई–पुण्याकडे प्रवास करतात. मात्र, थेट रेल्वे सेवेअभावी आजही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
मार्ग सक्षम, मग अडथळा कसला?
धुळे–मनमाड रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्णत्वाकडे असून, पायाभूत सुविधा आता सक्षम झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांत या मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरून थेट एक्सप्रेस सुरू करणे व्यवहार्य आणि आवश्यक असल्याचे रेल्वे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
प्रस्ताव थेट मंत्रालयाकडे पाठवण्याची मागणी
नागरिकांची मागणी आहे की, धुळे रेल्वे स्थानक प्रशासनाने तातडीने सविस्तर प्रस्ताव तयार करून तो वरिष्ठ रेल्वे अधिकारी व केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठवावा. या प्रस्तावात—
धुळे–मुंबई (रात्रीची) व धुळे–पुणे थेट एक्सप्रेसची गरज
संभाव्य वेळापत्रक
प्रवासी संख्येचा अंदाज
सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक फायदे
यांचा ठोस व आकडेवारीसह उल्लेख करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पूर्वीही मागणी, आता निर्णायक टप्पा!
यापूर्वी अनेकदा सामाजिक संघटना, व्यापारी महासंघ, विद्यार्थी संघटना आणि लोकप्रतिनिधींनी लेखी निवेदने देऊन ही मागणी मांडली होती. मात्र, ती प्रत्यक्षात उतरलेली नव्हती. आता मात्र पायाभूत सुविधा सक्षम झाल्या असून प्रवासी संख्या वाढली असल्याने ही मागणी निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. स्थानक प्रशासनाकडून अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात आल्याची चर्चाही रंगू लागली असून, त्यामुळे मागणीला नवे बळ मिळाले आहे.
संयुक्त आंदोलनाची तयारी
दरम्यान, नागरिक, व्यापारी संघटना, शैक्षणिक संस्था आणि विविध प्रवासी संघटना संयुक्त निवेदन देण्याच्या तयारीत असून, स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या प्रश्नावर रेल्वे मंत्रालय आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा करावा, अशी जोरदार अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विकासाला नवी गती!
धुळे–मुंबई रात्रीची नियमित एक्सप्रेस आणि धुळे–पुणे व्हाया मनमाड–दौंड स्वतंत्र एक्सप्रेस सुरू झाल्यास धुळे शहराचा दळणवळण नकाशावरचा दर्जा उंचावेल. औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक विकासाला चालना मिळेल आणि उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला नवी गती मिळेल, असा ठाम विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.
आता प्रश्न एकच — रेल्वे प्रशासन धुळेकरांचा आवाज ऐकणार का?
की ही मागणी पुन्हा एकदा फक्त कागदावरच राहणार?
