मातीशी नाळ जुळवून ठेवत शेती करणारा शेतकरी जेव्हा शब्दांच्या बळावर जागतिक साहित्य मंच गाजवतो, तेव्हा ती केवळ व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण ग्रामीण संस्कृतीची विजयगाथा ठरते. शिरपूर तालुक्यातील तहाडी गावचे प्रगतिशील शेतकरी व संवेदनशील कवी कैलास किसान करंके यांनी हेच सिद्ध करत साताऱ्यात भरलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी काव्य संमेलनात आपल्या प्रभावी कवितेने साहित्यविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिनांक ३ जानेवारी रोजी सादर केलेल्या त्यांच्या कवितेने शेतकऱ्यांचे दुःख, ग्रामीण वास्तव, सामाजिक विषमता आणि मानवी संवेदना यांचे जिवंत दर्शन घडवले. प्रत्येक ओळीतून झिरपणारा अनुभव, वेदना आणि आशा यामुळे संमेलनातील रसिक अक्षरशः भारावून गेले. टाळ्यांच्या कडकडाटात सभागृह दणाणून गेले आणि तहाडी गावचा हा कवी संमेलनाचा केंद्रबिंदू ठरला.
देश-विदेशातून उपस्थित असलेल्या नामवंत कवी, साहित्यिक, समीक्षक आणि अभ्यासकांच्या उपस्थितीत कैलास करंके यांच्या साहित्यिक योगदानाची विशेष दखल घेत जागतिक साहित्य मंचावर त्यांना पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. विविध देशांतील साहित्यिकांनी त्यांच्या लेखनातील वास्तववाद, समाजभान आणि शब्दांची ताकद यांचे भरभरून कौतुक केले. ग्रामीण भागातून येऊन जागतिक पातळीवर साहित्यिक सन्मान मिळवणे ही बाब प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
“शेती ही उपजीविका आणि कविता ही आत्म्याची हाक” असे मानणाऱ्या कैलास करंके यांनी आपल्या लेखणीतून शेतकऱ्यांचा आवाज, संघर्ष, अन्यायाविरुद्धची जाणीव आणि उज्वल भविष्यासाठीची आशा प्रभावीपणे मांडली आहे. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक नसून तहाडी गाव, शिरपूर तालुका आणि धुळे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद ठरले आहे.
या ऐतिहासिक यशामुळे तहाडी गावात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून गावकरी, मित्रपरिवार, साहित्यप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडून कैलास करंके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात असून, “ग्रामीण शब्दांचा जागतिक आवाज” अशी त्यांची ओळख अधिक भक्कम होत आहे.
