शब्दांच्या लढाईला माणुसकीची किनार; पत्रकार दिनी अनाथ मुलांना उब देणारा मराठी दक्ष पत्रकार संघाचा उपक्रम

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर / प्रतिनिधी :
पत्रकारितेचा खरा धर्म केवळ बातमी देण्यापुरता मर्यादित नसून समाजातील उपेक्षित घटकांपर्यंत संवेदनेचा हात पोहोचविण्यात आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारा उपक्रम शिरपूर येथे पार पडला. मराठी दक्ष पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त कै. बापुसो एन. झेड. मराठे विधायक संस्था संचलित अनाथ व मतिमंद मुलांचे वसतिगृह, शिरपूर येथे थंडीची टोपी व फळवाटपाचा सामाजिक कार्यक्रम उत्साहात पार पडल


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ पत्रकार श्री. रंजित मोरे सर उपस्थित होते. यावेळी मराठी दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. आण्णासो दिनकरराव भिलाजी पवार, खोंडे न्यूजचे ब्युरो चीफ आण्णासाहेब शैलेंद्र खोंडे, फुले शाहू आंबेडकर वृत्तपत्राचे संपादक ॲड. रमेश मोतिराम ईशी, सत्यशोधक खान्देशचे संपादक प्रा. कचरू भिका अहिरे तसेच योगेश धनगर सर आदी मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश पाटील सर यांनी केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात रंजित मोरे सर म्हणाले, “पत्रकार दिन हा केवळ गौरवाचा नसून सामाजिक बांधिलकी जपण्याचा दिवस आहे. आजचा उपक्रम म्हणजे पत्रकारितेच्या माणुसकीचा जिवंत दाखला आहे.”
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील अनाथ व मतिमंद मुलांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी मराठी दक्ष पत्रकार संघाच्या वतीने गरम टोपींचे वाटप करण्यात आले. तसेच अल्पोपहार म्हणून फळवाटप करून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. पत्रकार बांधवांनी मुलांशी संवाद साधत त्यांना आपुलकीची भावना दिली.
कार्यक्रमास शाळेतील शिक्षकवृंद देशमुख स्वप्नील, गणेश धनगर, एकनाथ ओगले, प्रतिक चव्हाण, प्रविण पाटील, स्वप्नील वाघ, राकेश पाटील, दीपक पाटील, चंदू पाटील, पाटोळे रविंद्र आदींसह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.
शब्दांच्या माध्यमातून समाजाला आरसा दाखविणाऱ्या पत्रकारांनी या उपक्रमातून समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी कृतीतून सिद्ध केली. पत्रकार दिनाचे औचित्य साधत अनाथ मुलांना उब देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला स्पर्श करून गेला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default