दारूच्या नशेत घरात थैमान, जबाबदारीचा विसर
साखरे पाडा गावाचे उपसरपंच जयराम महारू पवार (वय 65) हे दारूच्या तीव्र व्यसनाधीन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या व्यसनामुळे घरात नेहमीच वाद होत असल्याचे सांगण्यात येते. पत्नी जिजाबाई जयराम पवार (वय 60) या पतीला दारू सोडण्यासाठी वारंवार समज देत असत. मात्र, ही समजूतच पुढे त्यांच्या जीवावर बेतली.
मध्यरात्री पुन्हा वाद, संतापाचा स्फोट
घटनेच्या रात्री जयराम पवार हे दारूच्या नशेत घरी आले. यावेळी पुन्हा पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. वाद निवळल्यानंतर जिजाबाई झोपण्यासाठी खाटेवर गेल्या. मात्र, आतून पेटलेला संताप जयराम पवार यांच्या मनात धगधगतच राहिला.
झोपेतच धारदार शस्त्राने सपासप वार
पत्नी गाढ झोपेत असतानाच जयराम पवार यांनी घरातील धारदार शस्त्र उचलले आणि झोपेतच जिजाबाई यांच्यावर सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात जिजाबाई कोसळल्या. जागीच त्यांचा मृत्यू झाला. एका जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीकडून असा थरकाप उडवणारा प्रकार घडल्याने गावात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं.
हत्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न
पत्नीचा मृतदेह पाहून घाबरलेल्या जयराम पवार यांनी नंतर शेतातील पिकांसाठी वापरले जाणारे कीटकनाशक विष प्राशन केले. सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर अवस्थेत असलेल्या जयराम पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
गावात शोककळा, व्यसनाधिनतेचा भयानक चेहरा
या घटनेमुळे साखरे पाडा गावावर शोककळा पसरली आहे. समाजात जबाबदारीचे पद भूषवणाऱ्या व्यक्तीने व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या पत्नीचा जीव घेणे, ही बाब अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, अशा व्यक्तींना पदावर राहण्याचा अधिकार आहे का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
पोलीस तपास सुरू
या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. घटनेतील वापरलेले शस्त्र, विषप्राशनाची खातरजमा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली जात आहे.
