पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नागरिकांचे उतारवय सुसह्य व्हावे, दैनंदिन जीवनात त्यांना स्वावलंबी होता यावे आणि कोणावरही अवलंबून राहावे लागू नये या उद्देशाने राष्ट्रीय वयोश्री योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून वाघर्डे येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात शारीरिक व्याधींनी त्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या गरजेनुसार विविध सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले. चालताना आधार मिळावा यासाठी वॉकर व काठ्या, हालचाली सुलभ व्हाव्यात यासाठी व्हीलचेअर, दैनंदिन गरजांसाठी कमोड टॉयलेट चेअर, कंबरदुखी व मणक्याच्या त्रासासाठी पाठीचे पट्टे आदी साहित्य देण्यात आले. यासोबतच सर्व लाभार्थ्यांची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सखोल तपासणीही करण्यात आली.
या कार्यक्रमाला योजनेचे समन्वयक डॉ. किरण पावरा, तालुका अध्यक्ष विश्वास ठाकरे, जामचे सरपंच सुभाष वाघ, वाघर्डेचे सरपंच सखाराम मोते, दामळदा उपसरपंच डॉ. विजय चौधरी, माजी जि. प. सदस्य सुनील चव्हाण, संदीप गिरासे, जावदा सरपंच संजय माळी, कोचरा सरपंच नवनाथ वाघ, सुनील सुळे, स्वीय सहाय्यक हेमराज पवार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासनाच्या या मदतीमुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करत सरकारचे आभार मानले. विशेष म्हणजे या शिबिरात वाघर्डे येथील १०२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक किडुबाई शंकर पवार यांचा सन्मान करण्यात येऊन त्यांना मदत साहित्य देण्यात आले. उपस्थितांसाठी हा क्षण प्रेरणादायी ठरला.
यावेळी आमदार राजेश पाडवी म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हे समाजाचा अनुभवसंपन्न आधारस्तंभ आहेत. त्यांनी उतारवयात सन्मानाने आणि आत्मनिर्भरतेने जीवन जगावे, हीच सरकारची भूमिका आहे. वयोश्री योजना प्रत्येक गरजू घरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
आगामी महिन्यात शहादा व तळोदा येथे प्रत्येकी एक हजार ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार असून त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येणार असल्याची माहिती आमदार पाडवी यांनी दिली. वयोश्री योजनेमुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठांना दिलासा मिळत असून त्यांच्या जीवनात नव्या आशेचा किरण निर्माण झाला आहे.
