वडिलांच्या छोट्याशा सलून दुकानात केस कापत असतानाच ‘NIT वारंगल’ (तेलंगणा) येथील पीएच.डी. संशोधनासाठी निवड झाल्याची आनंदवार्ता घनश्यामपर्यंत पोहोचली… त्या क्षणी त्याच्या हातात कात्री होती, चेहऱ्यावर घाम होता; पण डोळ्यांत चमक होती – आयुष्य जिंकल्याची!
सलूनमधून विज्ञानाच्या प्रयोगशाळेपर्यंत
छडवेल पखरुन येथे गोल्डी हॉटेलच्या शेजारी धर्मराज हिरे यांचे छोटेसे सलून. हाच घराचा आधार.
परिस्थिती कठीण होती, पण घनश्यामने कधीही परिस्थितीला दोष दिला नाही. उलट, सकाळी सात वाजल्यापासून वडिलांसोबत सलूनमध्ये काम, आणि सकाळी अकराला थेट सी. गो. पाटील विज्ञान महाविद्यालयात हजेरी – असा त्याचा रोजचा दिनक्रम.
वह्या, पुस्तके, परीक्षा फी… कोणावरही ओझं न बनता, स्वतःच्या कष्टाच्या पैशातून शिक्षण पूर्ण करण्याचा त्याचा हट्ट होता.
“कामाची लाज नाही,” हे तो केवळ बोलत नव्हता, तर जगत होता.
‘A+’ ते मुंबई… आणि आता वारंगल!
बी.एससी. केमिस्ट्रीमध्ये घनश्यामने ‘A+’ ग्रेडसह प्रथम क्रमांक पटकावला आणि आपली गुणवत्ता सिद्ध केली. याच जोरावर त्याची निवड मुंबईतील डॉ. होमी भाभा युनिव्हर्सिटी येथे एम.एससी.साठी झाली.
मुंबईत शिक्षण घेत असतानाही सुट्टी मिळाली की तो गाव गाठायचा… आणि पुन्हा सलूनमध्ये कात्री हातात घ्यायचा.
कारण मुळाशी प्रामाणिक राहणं, हेच त्याचं बळ होतं.
अखेर, मेहनतीचं चीज झालं. NIT वारंगल येथील कठीण प्रवेश परीक्षा आणि मुलाखत घनश्यामने यशस्वीरित्या पार केली. आता तो सेंद्रिय रसायनशास्त्र (Organic Chemistry) विभागात ‘पॉलिमर’ विषयावर पीएच.डी. संशोधन करणार आहे.
गावासाठी अभिमानाचा क्षण
घनश्यामच्या निवडीची बातमी गावात पोहोचताच अभिनंदनाचा अक्षरशः पूर आला.
अनेक जण सलूनमध्ये भेटायला आले… आणि तोच घनश्याम कात्री हातात घेऊन, नम्रपणे काम करताना पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
शिक्षण, मेहनत आणि संस्कार यांचा संगम म्हणजे घनश्याम हिरे, अशी भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
स्वप्न अजून मोठं आहे…
घनश्याम इथेच थांबणार नाही.
पीएच.डी. पूर्ण करून परदेशात पोस्ट-डॉक्टरेट करण्याचं आणि देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून योगदान देण्याचं त्याचं स्वप्न आहे.
घनश्याम हिरे म्हणतो…
“कोणतेही काम लहान नसते.
वडिलांच्या कामात हातभार लावत शिक्षण पूर्ण केल्याचा मला अभिमान आहे.
जिद्द आणि चिकाटी असेल, तर ग्रामीण भागातील मुलंही अशक्य वाटणारी स्वप्नं पूर्ण करू शकतात
