‘काम पूर्ण, पण पैसे अडवले!’
तक्रारदार हा शासकीय नोंदणीकृत विद्युत ठेकेदार असून त्याच्या फर्मला नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील 28 गावांमध्ये व पाड्यांमध्ये LED सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचा ठेका मंजूर झाला होता.
सार्वजनिक बांधकाम विभाग, धुळे अंतर्गत GST वगळता तब्बल 2 कोटी 37 लाखांहून अधिक रकमेची निविदा मंजूर झाली होती. सर्व कामे वेळेत आणि नियमानुसार पूर्ण करण्यात आली होती.
पहिल्याच बिलात ‘डील’?
मार्च 2025 मध्ये सुमारे 41 लाख रुपयांचे बिल मंजूर झाले. मात्र त्यावेळी उपअभियंता नितीन इंगळे याने 80 हजार रुपये स्वीकारून उर्वरित रक्कम पुढील बिलावेळी देण्याची मागणी केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर पुढील बिलासाठी ठेकेदाराला सतत दबाव टाकण्यात येत होता.
8.50 लाखांची थेट मागणी
डिसेंबर 2025 मध्ये उर्वरित कामाचे 2 कोटी 2 लाखांहून अधिक रुपये ठेकेदाराच्या खात्यात जमा झाले. यानंतर उपअभियंत्याने “बिल पास केल्याच्या मोबदल्यात 8 लाख 50 हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा पुढील कामांची फाईल पुढे सरकणार नाही” असा थेट इशारा दिल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.
ACBचा सापळा अन् रंगेहात पकड
या त्रासाला कंटाळून ठेकेदाराने धुळे ACBकडे अधिकृत तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर ACBने सापळा रचला.
तडजोडीनंतर 8 लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले.
सोमवार, 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी, धुळ्यातील PWD कार्यालयात नितीन इंगळे याला रोख रक्कम स्वीकारताना ACBच्या पथकाने रंगेहात पकडले आणि तात्काळ अटक केली.
विभागात खळबळ, चौकशीचे संकेत
या कारवाईमुळे सार्वजनिक बांधकाम विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोलर स्ट्रीट लाईट प्रकल्पातील इतर कामांमध्येही अशाच प्रकारचा ‘टक्केवारी’चा प्रकार झाला का? याची चौकशी होण्याची शक्यता आहे.
ACBकडून पुढील तपास सुरू असून इतर अधिकारी वा मध्यस्थांचा सहभाग आहे का, याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

