शिरपूर तालुक्यातील उमर्दा (प्रधानदेवी) येथे घडलेल्या थरारक हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला असून, पत्नीची निर्घृण हत्या करून तब्बल दहा दिवस फरार असलेला पती पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. शिरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने रचलेल्या अचूक सापळ्यामुळे आरोपी पमा झंझाड्या पावरा याला सोमवारी (९ फेब्रुवारी) अटक करण्यात आली.
३० जानेवारी रोजी चारित्र्याच्या संशयावरून पमा पावरा याने आपल्या पत्नीवर अमानुष हल्ला केला होता. घराजवळच लाकडी दांडक्याने डोक्यावर तसेच हात-पायांवर बेदम मारहाण करत त्याने पत्नीचा जागीच जीव घेतला. एवढ्यावरच न थांबता गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जवळच्या नाल्यात फेकून देत आरोपी फरार झाला होता.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. मृत महिलेचे भाऊ आसाराम सेनानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यानंतर आरोपीने स्वतःचा मोबाईल बंद ठेवत पोलिस तपासाला चकवा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याचा शोध घेणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते.
दरम्यान, आरोपी आपल्या कपड्यांसह आवश्यक सामान घेण्यासाठी गावी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने उमर्दा गावात घराजवळ सापळा रचला. सोमवारी सकाळीच आरोपी गावी येताच पोलिसांनी झडप घालत त्याला अटक केली.
पोलिस चौकशीत आरोपीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यानेच आपण तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज कचरे, सुनील वसावे, मिलिंद पवार, संतोष पाटील, संदीप ठाकरे, भूषण पाटील, योगेश मोरे आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
दहा दिवसांनंतर उघडकीस आलेल्या या थरारक घटनेने पुन्हा एकदा कौटुंबिक वादातून होणाऱ्या गुन्ह्यांचे भयावह वास्तव समोर आणले असून, शिरपूर तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपी अखेर सलाख्यांमागे गेला आहे.

