अबुझमाडच्या जंगलात रक्तरंजित धुमश्चक्री!सी-६० जवान दीपक मडावी शहीद; ३ नक्षलवादी ठार

फुले शाहू आंबेडकर
0
गडचिरोली | विशेष प्रतिनिधी :
छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या निर्णायक कारवाईदरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सी-६० पथकाचे जवान दीपक चिन्ना मडावी यांनी वीरमरण पत्करले. या भीषण चकमकीत पोलिसांनी तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले, तर एक जवान जखमी झाला आहे.
भामरागड उपविभागातील अतिदुर्गम भागात ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी नक्षलवादी संघटना ‘कंपनी क्रमांक १०’ व छत्तीसगडमधील एका दलमची हालचाल असल्याची गोपनीय माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सी-६० च्या १४ पथकांनी रात्रीच जंगलात कूच करत शोधमोहीम सुरू केली.
रात्रीपासून दिवसभर गोळीबार, दोन नक्षल तळ उद्ध्वस्त
सलग अनेक तास चाललेल्या धुमश्चक्रीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त केले. गुरुवारी अतिरिक्त सी-६० पथके आणि सीआरपीएफच्या तुकडीला पाचारण करण्यात आल्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला. नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केल्याने परिसर युद्धभूमीत बदलला.
३ नक्षलवादी ठार; शस्त्रसाठा जप्त
या कारवाईत आतापर्यंत ३ नक्षलवादी (२ पुरुष व १ महिला) ठार झाले असून, घटनास्थळावरून एक एके-४७ आणि एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. ठार नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
देशासाठी बलिदान! जवान दीपक मडावी यांचे वीरमरण
नक्षलवाद्यांच्या गोळीबारात सी-६० पथकाचे ३८ वर्षीय जवान दीपक चिन्ना मडावी (रा. अहेरी, मूळ मांड्रा) गंभीर जखमी झाले होते. पहाटे त्यांना अबुझमाडच्या जंगलातून हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढून भामरागड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अहेरीचे सुपुत्र असलेल्या दीपक मडावी यांच्या शौर्याने संपूर्ण जिल्हा शोकसागरात बुडाला आहे.
एक जवान जखमी; प्रकृती स्थिर
याच चकमकीत जोगा मडावी हे जवानही गोळी लागून जखमी झाले आहेत. त्यांना देखील हेलिकॉप्टरने बाहेर काढण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पुढील उपचारांसाठी त्यांना गडचिरोली येथे हलवण्यात येत आहे.
शोधमोहीम सुरूच; नक्षलवाद्यांचा वावर कायम
परिसरात अद्याप नक्षलवाद्यांचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता शोधमोहीम सुरूच ठेवण्यात आली आहे. दुर्गम जंगल, प्रतिकूल हवामान आणि जीवघेण्या परिस्थितीत जवान धैर्याने कारवाई करत आहेत. संपूर्ण मोहिमेचा सविस्तर तपशील शोधमोहीम पूर्ण झाल्यानंतर जाहीर केला जाईल, असे पोलीस दलाकडून सांगण्यात आले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default