नाचनखेडा येथील हळदीचा कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असताना गुरुवारी (दि. …) मध्यरात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास खेडगाव नंदीचे गावाजवळ ही घटना घडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला उलटली. अपघात होण्याच्या अवघ्या १० ते १५ सेकंद आधी चालकाने सोशल मीडियावर कारच्या स्पीड मीटरचा लाइव्ह व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये कारचा वेग ताशी १२० किमी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यानंतर अचानक “धडाम” असा भीषण आवाज झाला आणि मदतीसाठी किंचाळण्याचे आवाज परिसरात घुमले.
या अपघातात श्रीरंग सुरेश पाटील (वय २५) आणि प्रसन्न रवींद्र निमजे (दोघेही रा. पिंप्राळा, जळगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. मृत व जखमी सर्वजण जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील रहिवासी असून, हळदीच्या कार्यक्रमासाठी त्यांनी एका परिचिताची कार मागून घेतली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास कार्यक्रम आटोपून मित्र परतीच्या प्रवासाला निघाले होते.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की कारचे मोठे नुकसान झाले.
चार महिन्यांपूर्वीच संसार थाटला…
या अपघाताने एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सेंट्रल बँक कॉलनीत राहणारा श्रीरंग पाटील हा एमआर म्हणून कार्यरत होता. अवघ्या चार महिन्यांपूर्वी, २६ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याचे पिंप्राळा येथे राहणाऱ्या मामाच्या मुलीशी लग्न झाले होते. काही वर्षांपूर्वीच श्रीरंगच्या वडिलांचे हृदयविकाराने निधन झाले होते. त्याच्या पश्चात आई आणि दोन विवाहित बहिणी आहेत. एकुलता एक भाऊ या अपघातात गमावल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
वेगाची हौस ठरली जीवघेणी
हा अपघात केवळ वाहन अपघात नसून, वाढत्या वेगाच्या हव्यासाचे भीषण परिणाम समोर आणणारा आहे. सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ करत वेग दाखवण्याची प्रवृत्ती किती धोकादायक आहे, याचे हे जिवंत – आणि भयावह – उदाहरण ठरले आहे.
पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. वेग, निष्काळजीपणा आणि सोशल मीडियासाठी स्टंटबाजी यामुळे दोन तरुणांचे प्राण गेले असून, हा अपघात तरुणांसाठी गंभीर इशारा ठरत आहे.

