तहसीलदार प्रदीपकुमार रावसाहेब पवार (वय ३४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं काय घडलं?
दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ७.५० वाजता, तहसीलदार पवार यांच्या नेतृत्वाखालील भरारी पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी शहरात गस्त घालत होते. दरम्यान सी.बी. पेट्रोल पंपाजवळील सार्वजनिक रस्त्यावर संशयित ट्रक अडवून कागदपत्रांची मागणी करण्यात आली.
यावेळी ट्रक चालक गौरव सुरेश महिरे (वय २२) व क्लीनर पंकज राहुल बाविस्कर (वय २६, दोघे रा. पहेलवान नगर, नंदुरबार) यांनी आक्रमक भूमिका घेत थेट तहसीलदारांच्या अंगावर धाव घेतली. दोघांनी तहसीलदार पवार यांना धक्काबुक्की करत पथकातील कर्मचाऱ्यांनाही ढकलाढकली केली.
वाढती दादागिरी; प्रशासन हादरले
नंदुरबार जिल्ह्यात वाळू तस्करांची दादागिरी ही नवी बाब नसून, यापूर्वी मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या घरात घुसून मारहाण करण्याच्या घटना घडल्या आहेत. सुमारे तीन आठवड्यांपूर्वी भरारी पथकातील अधिकाऱ्यावर हल्ला झाला होता. त्या प्रकरणात गुन्हा दाखल होऊन काही दिवस उलटले नसतानाच आता तहसीलदारांवरच हात उचलण्याचा प्रयत्न झाल्याने प्रशासनात संतापाची लाट उसळली आहे.
गुन्हा दाखल; आरोपी ताब्यात
तहसीलदार पवार यांनी १३ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी दिलेल्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
प्रश्न अनुत्तरित…
अवैध वाळू तस्करीमागे मोठं रॅकेट आहे का?
प्रशासनावर वाढते हल्ले थांबवण्यासाठी कठोर कारवाई होणार का?
अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येणार का?
नंदुरबारमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, प्रशासनाने आता निर्णायक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.

