फिर्यादी कैलास भाऊसाहेब कराळे (वय ६०, रा. गोविंदनगर) यांनी ‘धनंजय कन्स्ट्रक्शन’च्या वतीने तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन १९९७ पासून व्यवसायिक ओळखीतून कदम यांना कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पुढे सन २०१९ ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कदम यांनी आपल्या मुलांची ओळख करून देत ते आयकर व जीएसटीचे काम पाहतात व ते ‘सीए’ असल्याचे भासविले.
बनावट आयडी-पासवर्डचा खेळ
तक्रारीनुसार, कंपनीचे सर्व कागदपत्रे व आर्थिक व्यवहारांची जबाबदारी संशयितांकडे सोपविण्यात आली. जीएसटी नोंदणी करताना ललित कदम यांनी स्वतः आयडी व पासवर्ड तयार केला. कराळे यांच्या मोबाईलवर येणारे ओटीपी विचारून घेतले जात होते. “काम सुरळीत सुरू आहे,” असे सांगून विश्वास संपादन करण्यात आला.
दरम्यान, जीएसटी व आयकर भरण्यासाठी वेळोवेळी कोट्यवधी रुपये संशयितांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आले. मात्र, पावत्या मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आयडी व पासवर्ड देण्यासही टाळाटाळ करण्यात आली.
जीएसटी कार्यालयात उघड झाला घोळ
व्यवहारांबाबत संशय आल्याने कराळे यांनी पाथर्डी फाटा येथील जीएसटी कार्यालयात धाव घेतली. अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, सन २०१९ पासून फक्त सुमारे एक ते सव्वा कोटी रुपयेच जीएसटी भरल्याचे आढळले. तब्बल एक कोटी २४ लाख रुपये भरलेच नसल्याचे स्पष्ट झाले.
थकीत रक्कम, दंड व व्याज मिळून एकूण २ कोटी ४२ लाख ६० हजार रुपये भरण्याची नोटीस देण्यात आली. यामुळे फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.
‘सीए’ नाही, फक्त सल्लागार…
तक्रारीनुसार, संशयितांनी स्वतःला ‘सीए’ असल्याचे भासविले; मात्र ते अधिकृत चार्टर्ड अकाउंटंट नसल्याची बाब समोर आली आहे. चौकशीदरम्यान रक्कम स्वतःच्या वापरासाठी वळविल्याचे कबूल केल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. “रक्कम भरतो,” असे आश्वासन देत वेळकाढूपणा करण्यात आला.
पोलिस तपास सुरू
या प्रकरणी फसवणूक, विश्वासघात व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. बँक खात्यांचे स्टेटमेंट, जीएसटी पोर्टलवरील लॉगिन तपशील, तसेच ओटीपी व्यवहारांची माहिती तपासली जात आहे.
नाशिकमध्ये कर सल्लागारांच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालण्याची ही घटना व्यवसायिक वर्तुळात खळबळ उडवणारी ठरली आहे. जीएसटी व आयकर व्यवहार करताना अधिकृत व प्रमाणित तज्ज्ञांकडूनच काम करून घेण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

