२० रुपयांची लाच, ३० वर्षांचा छळ अन् शेवटी मृत्यू!निर्दोष ठरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माजी पोलिसाचा हृदयद्रावक अंत

फुले शाहू आंबेडकर
0
अहमदाबाद | प्रतिनिधी
न्याय मिळाला… पण आयुष्य हरपले!
अवघ्या २० रुपयांच्या कथित लाचप्रकरणात तब्बल ३० वर्षे न्यायालयीन लढा देणाऱ्या माजी पोलिस कॉन्स्टेबलचा, निर्दोष मुक्ततेनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील ही घटना न्यायव्यवस्थेतील विलंब आणि निष्पाप व्यक्तींच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामांची भीषण जाणीव करून देणारी ठरत आहे.
३० वर्षांचा अन्याय… शेवटी न्याय, पण तोच ठरला अखेरचा!
पोलीस कॉन्स्टेबल बाबूभाई प्रजापती हे १९९६ साली अहमदाबाद येथे सेवेत असताना त्यांच्यावर २० रुपयांची लाच घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या या प्रकरणाने त्यांच्या आयुष्याला वेगळेच वळण दिले.
२० नोव्हेंबर १९९६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर १९९७ मध्ये त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल झाले.
२००२ मध्ये आरोप निश्चित झाले,
२००३ मध्ये साक्षीदारांची सुनावणी सुरू झाली
आणि अखेर २००४ मध्ये सत्र न्यायालयाने प्रजापती यांना ४ वर्षांची शिक्षा व ३ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
२२ वर्षे फाईल धूळ खात राहिली…
सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात प्रजापती यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांची याचिका तब्बल २२ वर्षे प्रलंबित राहिली.
दरम्यान या काळात त्यांनी सामाजिक अपमान, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी आणि नोकरी गमावण्याची वेदना सहन केली.
४ फेब्रुवारी : न्याय मिळाला…
गुजरात उच्च न्यायालयाने ४ फेब्रुवारी रोजी निकाल देत बाबूभाई प्रजापती यांना निर्दोष घोषित केले.
न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नमूद केले की,
“साक्षीदारांच्या जबाबात गंभीर विसंगती आहेत. फिर्यादी पक्ष आरोप सिद्ध करण्यात पूर्णतः अपयशी ठरला आहे.”
निकालानंतर प्रजापती भावूक झाले होते.
ते म्हणाले होते,

“माझ्या आयुष्यावरचा कलंक आज पुसला गेला आहे. आता देवाने मला बोलावले तरी कोणतेही दु:ख नाही.”
…आणि दुसऱ्याच दिवशी काळाने घाव घातला
निर्दोष ठरून घरी परतलेल्या बाबूभाई प्रजापती यांचा दुसऱ्याच दिवशी हृदयविकाराने मृत्यू झाला.
हा क्षण त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वांसाठी धक्का देणारा ठरला.
त्यांचे वकील नितीन गांधी यांनी सांगितले,
“काल ऑफिसमध्ये ते अत्यंत आनंदी होते. मी त्यांना सरकारकडील सर्व लाभांसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला होता. दुसऱ्या दिवशी फोन केला तेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली…”
न्याय मिळाला, पण आयुष्याची भरपाई कोण देणार?
३० वर्षांच्या अन्यायानंतर मिळालेला न्याय प्रजापती पाहू शकले, मात्र तो उपभोगण्याआधीच त्यांचा अंत झाला.
या घटनेमुळे न्यायालयीन विलंब, निष्पाप व्यक्तींचा होणारा छळ आणि व्यवस्थेची संवेदनाहीनता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
आज बाबूभाई प्रजापती निर्दोष ठरले असले, तरी
त्यांचे हरवलेले आयुष्य, प्रतिष्ठा आणि आरोग्य परत येणार आहे का?
हा प्रश्न संपूर्ण व्यवस्थेसमोर उभा राहिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default