नाशिक हादरलं! महिला सरपंचासह पती १५ हजारांच्या लाचेसह रंगेहात जेरबंदअविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी पैशांची मागणी; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

फुले शाहू आंबेडकर
0
नाशिक (ता. दिंडोरी) — ग्रामपंचायतीतील सत्तासंघर्षाला पैशांचा रंग चढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रासेगाव व देहरेवाडी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील ग्रामपंचायतीच्या अविश्वास ठराव प्रकरणात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला सरपंच आणि त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

या प्रकरणी सरपंच मंदा विठ्ठल बेडकुळे (वय ३५) आणि त्यांचे पती विठ्ठल पांडुरंग बेडकुळे (वय ३९) यांच्याविरुद्ध Prevention of Corruption Act, १९८८ अंतर्गत कलम ७ व ७अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
५० हजारांची मागणी, २५ हजारांवर सौदा!
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ला.प्र.), नाशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे संबंधित ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत. त्यांच्या विरोधात दाखल अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला तब्बल ५० हजार रुपयांची मागणी केली होती. चर्चेनंतर रक्कम २५ हजारांवर ठरली. त्यापैकी पहिल्या हप्त्यात १५ हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले.
तक्रारदारांनी धाडस दाखवत थेट ला.प्र. विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानंतर सापळा रचण्यात आला.
१४ हजार सरपंचांकडे, १ हजार पतीकडे
पंचासमक्ष तक्रारदारांनी १५ हजार रुपयांची रक्कम आरोपींना दिली. त्यापैकी १४ हजार रुपये सरपंच मंदा बेडकुळे यांनी स्वीकारले, तर १ हजार रुपये त्यांच्या पतीने घेतले. पैसे स्वीकारताच सापळा पथकाने दोघांनाही रंगेहात जेरबंद केले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी (ला.प्र. विभाग, नाशिक) यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पथकामध्ये पोलीस हवालदार विनोद चौधरी व पोलीस कॉन्स्टेबल अनिल गांगोडे यांचा सहभाग होता. कारवाईस पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांचे मार्गदर्शन लाभले.
सत्तेसाठी पैशांचा खेळ?
ग्रामपंचायतीतील अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले असताना या लाचकांडाने खळबळ उडाली आहे. स्थानिक पातळीवर ‘सत्तेसाठी पैशांचा व्यवहार’ होत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. गावपातळीवरील प्रशासनातच भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर गेली आहेत, याचा हा गंभीर दाखला मानला जात आहे.
नागरिकांना आवाहन
 प्रतिबंधक विभागाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही शासकीय कामासाठी कोणीही लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ विभागाशी संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असेही विभागाने नमूद केले आहे.
ग्रामपातळीवरील सत्तासंघर्षाला भ्रष्टाचाराची जोड; महिला सरपंचासह पतीची रंगेहात अटक — नाशिक जिल्ह्यात खळबळ!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default