“चौकशीचा अहवाल फिरवण्यासाठी अडीच लाखांची डील; शहादा प्रशासनात खळबळ”“बदलीच्या खेळात लाचेची एन्ट्री! शहादा पंचायत समितीतील भ्रष्टाचार उघड”

फुले शाहू आंबेडकर
0
शहादा : जिल्ह्यातील प्रशासनाला हादरवणारी घटना उघडकीस आली असून शहादा येथील पंचायत समितीमधील कनिष्ठ सहाय्यक अभिजीत भावसार याला अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) पथकाने ही कारवाई केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
चौकशी अहवाल ‘मॅनेज’ करण्यासाठी मागितली लाच
तक्रारदार हे जिल्हा परिषदेचे सेवक असून ते काथर्दे येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून चौकशी सुरू होती. ही चौकशी तळोदा पंचायत समितीमार्फत करण्यात आली होती; मात्र अहवाल अस्पष्ट (मोघम) असल्याने नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट अभिप्राय मागवला होता.
सदर प्रकरणाची कागदपत्रे आणि अहवाल प्रक्रिया शहादा पंचायत समितीतील कनिष्ठ सहाय्यक अभिजीत भावसार यांच्याकडे होती. तक्रारदाराच्या बाजूने अहवाल देण्यासाठी त्यांनी अडीच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. ठरल्याप्रमाणे एका हॉटेलमध्ये रक्कम स्वीकारताना ACB पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली.
बदली, कार्यमुक्ती आणि ‘डिमांड’ची कुजबुज
तक्रारदार ग्रामसेवक हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून त्यांनी बदलीसाठी प्रयत्न केले होते. बीडमध्ये पदे रिक्त नसल्याने त्यांनी हिंगोली जिल्ह्यात बदली करून घेतल्याची माहिती आहे. यापूर्वी त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेशही देण्यात आले होते; मात्र कथित मागणी पूर्ण न झाल्यानेच त्यांना चौकशीत अडकवण्यात आल्याची चर्चा ग्रामसेवक वर्तुळात रंगली आहे.
तळोदा पंचायत समितीतील चार अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत चौकशी पार पडली होती. तरीही अहवाल समाधानकारक नसल्याचे सांगत नव्याने स्पष्ट अहवाल देण्यास सांगण्यात आले. याच पार्श्वभूमीवर २० तारखेला पंचायत समितीत बोलावून लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.
‘अडीच लाख’ फक्त एका अधिकाऱ्यासाठी की साखळी मोठी?
या प्रकरणात अडीच लाखांची रक्कम केवळ कनिष्ठ सहाय्यकासाठी होती की त्यामागे आणखी वरिष्ठांचा सहभाग आहे, याबाबत आता पोलिस तपासात धागेदोरे शोधले जाणार आहेत. चार वर्षांपूर्वी बदली झालेल्या ग्रामसेवकाला कार्यमुक्त न करता चौकशीत अडकविण्यामागे कोणाचा हात होता का, हा प्रश्नही उपस्थित होत आहे.
वरकरणी एकच अधिकारी लाच घेताना अडकला असला तरी या प्रकरणाची पाळेमुळे जिल्हा परिषद मुख्यालयापर्यंत पोहोचली आहेत का, याची जोरदार चर्चा सुरू आहे. ACB कडून पुढील चौकशी वेगाने सुरू असून आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default