“पोलीस ठाण्यातच रणांगण!” जळगावात दोन पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी; दोघे गंभीर जखमी

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव | प्रतिनिधी : शिस्त, संयम आणि कायद्याचे पालन यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पोलीस दलातच जर दोन कर्मचारी आमनेसामने भिडले, तर प्रशासनाच्या प्रतिमेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. अशीच धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री घडली. ड्युटी वाटपाच्या किरकोळ कारणावरून सुरू झालेला वाद काही मिनिटांतच विकोपाला जाऊन थेट हाणामारीत परिवर्तित झाला.
या घटनेत दोन्ही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
ड्युटीवरून वाद, थेट हातघाई
मिळालेल्या माहितीनुसार, शशिकांत पारधी आणि राकेश पाटील हे दोघेही गेल्या तीन ते चार वर्षांपासून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दोघांमध्ये काही महिन्यांपासून अंतर्गत वाद आणि हेवेदावे सुरू होते.
शनिवारी रात्री ड्युटी लावण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली. सुरुवातीला केवळ बोलाचाली असलेला वाद अचानक चिघळला आणि काही क्षणांतच दोघांनी एकमेकांवर हात उचलले. पोलीस ठाण्याच्या आवारातच झालेल्या या धुमश्चक्रीने सहकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दोघेही गंभीर जखमी
या हाणामारीत शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर चोपडा येथील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तर राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली असून हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. दोघांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
 वरिष्ठांची दखल; कठोर कारवाईचे संकेत
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेतली. पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी घटनेला दुजोरा देत सांगितले की, “ड्युटी लावण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. घटनेची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू असून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल.”
पोलीस ठाण्यातच घडलेल्या या प्रकारामुळे शिस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अंतर्गत मतभेद इतक्या टोकाला जाणे ही बाब चिंताजनक असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.
 शिस्तीवर प्रश्नचिन्ह
कायद्याचे रक्षकच जर नियंत्रण गमावत असतील, तर सामान्य नागरिकांचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. या घटनेमुळे पोलीस विभागातील अंतर्गत व्यवस्थापन, ड्युटी वाटपाची पद्धत आणि शिस्तीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणी अंतर्गत चौकशी होण्याची शक्यता असून संबंधितांवर विभागीय कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default