“नायब तहसीलदारांच्या सेवा पुस्तकात पत्नीचे नाव नाही!” – अर्ध्या पगाराच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

फुले शाहू आंबेडकर
0
मीरारोड | प्रतिनिधी
मीरा भाईंदर येथील अपर तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेल्या नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के यांच्या वैवाहिक वादाने आता प्रशासकीय पातळीवर गंभीर वळण घेतले आहे. त्यांच्या पत्नी प्राची भुर्के यांनी थेट ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन देत पतीच्या सेवा पुस्तिकेत वारस म्हणून स्वतःचे नाव नोंदवण्याची तसेच पगारातून दरमहा अर्धी रक्कम देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पत्नीचा आरोपांचा भडिमार
लातूर जिल्ह्यातील अंबाजोगाई मार्गावरील बनसोडे रुग्णालय परिसरात राहणाऱ्या प्राची भुर्के यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह शासनालाही निवेदन सादर केले आहे. या निवेदनासोबत त्यांनी पतीविरुद्ध दाखल गुन्ह्यांची प्रत आणि न्यायालयात सादर केलेले दोषारोपपत्र जोडले आहे.
प्राची यांच्या म्हणण्यानुसार,
पती प्रथमेश भुर्के यांनी कौटुंबिक हिंसाचार केला.
समाजमाध्यमांवर बनावट आयडी तयार करून बदनामी व मानसिक छळ केला.
गेली दोन वर्षे घराबाहेर काढून कोणतीही आर्थिक मदत दिली नाही.
“माझे वडील दिवंगत आहेत, आई आजारी आहे आणि लहान भाऊ शिक्षण घेत आहे. अशा परिस्थितीत मला जगणे असह्य झाले आहे,” असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
सेवा पुस्तिकेतील नावावरून वाद
प्राची यांचा आरोप आहे की, पतीने आपल्या सेवा पुस्तिकेत पत्नी म्हणून त्यांचे नाव वारस म्हणून नमूद केलेले नाही. त्यामुळे भविष्यातील हक्क आणि आर्थिक सुरक्षिततेवर गदा येऊ शकते. त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की,
सेवा पुस्तिकेत पत्नी म्हणून नाव नोंदवावे
पगारातून दरमहा अर्धी रक्कम देण्याचे आदेश द्यावेत
पतीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी
पतीची भूमिका वेगळी


या प्रकरणात नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “लग्नानंतर पत्नीने माझ्या आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. त्यातून वाद निर्माण झाले. माझ्यावर दाखल गुन्हे खोटे आहेत. ते रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली असून घटस्फोटासाठी दावा दाखल केला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाची पुढील भूमिका काय?
पत्नीने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतल्याने हे प्रकरण आता केवळ कौटुंबिक वादापुरते मर्यादित राहिलेले नाही. सेवा पुस्तिकेत नाव नोंदवणे, पगारातील हिस्सा आणि प्रलंबित गुन्हे यावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेत असल्याने अंतिम निर्णय न्यायालयाच्या निकालावर अवलंबून राहणार आहे. तरीही, एका जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित वाद सार्वजनिक पातळीवर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default