शिरपूर तालुक्यात पुन्हा ‘रबरी दूध’ प्रकरण! दूध तापवताच तयार झाला गोळा; अन्न व औषध प्रशासनाच्या तपासाला वेग

फुले शाहू आंबेडकर
0
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यात दुधाच्या शुद्धतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुक्यातील खर्दे गावात दूध गरम करताच ते चक्क रबरासारख्या घट्ट गोळ्यात रूपांतरित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अन्न व औषध प्रशासनाने तातडीने दखल घेत दुधाचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, खर्दे येथील रहिवासी आशाबाई बोरसे यांनी नेहमीप्रमाणे रात्री दूधवाल्याकडून अर्धा लिटर दूध घेतले होते. सकाळी त्यांनी ते दूध गरम करण्यासाठी गॅसवर ठेवले. काही वेळातच दूध उकळण्याऐवजी त्याचे रबरासारखे घट्ट गोळे तयार झाले. आश्चर्याची बाब म्हणजे हे गोळे हाताने तोडण्याचा प्रयत्न केला असता ते रबराप्रमाणे ताणले जात असल्याचे दिसून आले.
आशाबाई बोरसे यांनी सांगितले की, “आम्ही गेल्या पंधरा वर्षांपासून एकाच दूधवाल्याकडून दूध घेतो, पण असा प्रकार कधीच पाहिला नव्हता. दूध गरम करताच त्याचा रबरासारखा गोळा झाल्याने आम्हालाही धक्का बसला.”
प्रशासनाची तातडीची कारवाई
घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त गोपाल माहोरे, अन्न सुरक्षा अधिकारी अभिजित जाधव, शशिकांत राणे आणि हवालदार प्रमोद ईशी यांनी घटनास्थळी भेट देत दुधाचे नमुने जप्त केले. हे नमुने पुढील तपासणीसाठी संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी पथकाने संबंधित दूध पुरवठादाराच्या बाळदे येथील डेअरी आणि गोठ्यावर देखील जाऊन तपासणी केली. डेअरी चालकाने दररोज सुमारे ४०० लिटर दूध वितरण केले जात असल्याचे सांगितले असून अशी तक्रार केवळ एका ठिकाणाहूनच आल्याचा दावा केला आहे.
तज्ञांचे मत काय?
डेअरी तज्ञ सतीश झाडे यांनी सांगितले की, काही वेळा म्हशीच्या प्रसूतीनंतर तिसऱ्या दिवशी मिळणारे ‘चीक’ दूध (Colostrum) तापवले असता त्याचा देखील अशाच प्रकारे घट्ट गोळा होतो. मात्र, प्रत्यक्षात कोणते कारण आहे हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल.
पाच महिन्यांपूर्वीही घडला होता प्रकार
विशेष म्हणजे, २१ ऑक्टोबर २०२५ रोजी करवंद गावातही असाच प्रकार घडला होता. त्या वेळी लक्ष्मीबाई वाघ यांच्या घरी गरम केलेले दूध रबरासारख्या गोळ्यात बदलल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या प्रकरणाचा प्रयोगशाळा अहवाल अलीकडेच समोर आला असून त्यामध्ये दुधातील फॅटचे प्रमाण ४.३ टक्के असल्याचे नमूद करण्यात आले होते.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
सध्या या नव्या घटनेमुळे खर्दे आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दूधामध्ये भेसळ आहे का, की नैसर्गिक कारणामुळे हा प्रकार घडला, याबाबत सर्वांचे लक्ष आता प्रयोगशाळेच्या अहवालाकडे लागले आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त गोपाल माहोरे यांनी सांगितले की,
“तक्रारदाराकडे जाऊन प्रत्यक्ष चौकशी केली आहे. दुधाचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले जातील. तसेच संबंधित डेअरीवरही तपासणी करण्यात आली आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.”
दरम्यान, तालुक्यात वारंवार अशा घटना समोर येत असल्याने दुधाच्या गुणवत्तेबाबत कठोर तपासणी आणि कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default