धुळे जिल्हा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला एक कैदी कारागृहातून पळून गेल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही घटना गुरुवारी सकाळी घडूनही पोलिसांना रात्री उशिरा माहिती देण्यात आल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भिकन पिंजारी (वय ५४, रा. निफाड, जि. नाशिक) हा कैदी धुळे जिल्हा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. त्याच्याविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात खून आणि अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या प्रकरणात न्यायालयाने ३० एप्रिल २०२२ रोजी निकाल देत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
शेतीकामाच्या वेळी साधली संधी
कारागृह प्रशासनाने कैदी भिकन पिंजारी याला कारागृह परिसरातील बावडी बाग येथील शेतीकामासाठी नेमले होते. गुरुवारी सकाळच्या सुमारास तो इतर कैद्यांसह शेतीकाम करत असताना संधी साधून कारागृह परिसरातून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
कैदी फरार झाल्याचे लक्षात येताच कारागृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी कारागृहातील शिपायाने दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहिती देण्यात विलंब; संशयाचे सावट
नियमांनुसार अशा गंभीर घटनेची माहिती तात्काळ पोलिस अधीक्षकांना देणे आवश्यक असते, जेणेकरून लगेच नाकाबंदी, शोधमोहीम आणि तपास यंत्रणा सक्रिय करता येते. मात्र ही घटना सकाळी घडूनही पोलिसांना रात्री सुमारे आठ वाजेच्या सुमारास कळवण्यात आल्याचे समोर आले आहे.
या विलंबामुळे कैद्याला पळून जाण्यासाठी मोठी संधी मिळाल्याची चर्चा सुरू असून कारागृह प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्हाभर शोधमोहीम; पोलिसांची धावपळ
दरम्यान, फरार कैद्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी जिल्हाभर मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. धुळे जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला असून विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
रेल्वे स्थानके, बसस्थानके तसेच राज्याच्या सीमावर्ती भागात तपासणी वाढविण्यात आली आहे. संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असून पोलिसांकडून तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
खून आणि अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणारा कैदी फरार झाल्यामुळे पोलिसांसमोर त्याला लवकरात लवकर पकडण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः माहिती उशिरा मिळाल्याने त्याचा माग काढणे अधिक कठीण झाले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे धुळे जिल्हा कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून प्रशासनावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.

