जळगाव शहरात गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत असल्याचे चित्र समोर आले आहे. वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी संतापलेल्या तरुणाने भरवस्तीत गावठी कट्ट्यातून बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही; मात्र भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वाल्मिक नगर परिसरात राहणारे रसाल राठोड (वय ४८) हे नेरीनाका स्मशानभूमी परिसरातून कामानिमित्त जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी त्यांना अडवून वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर या तिघांनी रसाल राठोड यांना बेदम मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जखमी अवस्थेत असताना त्यांनी तातडीने आपल्या मुलगा अनिल राठोड याला फोन करून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. वडिलांवर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच अनिल संतापला आणि हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडला.
काही वेळातच वाल्मिक नगरातील घरकुल चौक परिसरात वडिलांना मारहाण करणारे तिघे जण बसलेले असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. संतापाच्या भरात अनिलने आपली दुचाकी त्यांच्या दिशेने वळवली आणि कमरेला लावलेल्या गावठी बंदुकीतून त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली आहे.
गोळीबाराचा मोठा आवाज होताच परिसरात एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांनी घाबरून पळापळ केली. काही काळासाठी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या बेछूट गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत मारहाण करणाऱ्या गटातील प्रशांत चौधरी आणि हिमांशू सांखला या दोघांना ताब्यात घेतले आहे. तसेच दुसऱ्या गटातील सुनील राठोड यालाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, गोळीबार करणारा मुख्य संशयित अनिल राठोड हा घटनेनंतर घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे. शहरातील विविध ठिकाणी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
भरवस्तीत भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे जळगाव शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून अशा घटनांवर कठोर कारवाई करून गुन्हेगारीवर लगाम लावावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून नेमका वाद कशामुळे झाला आणि गोळीबाराच्या घटनेमागील पार्श्वभूमी काय आहे, याचा शोध घेतला जात आहे.

