लग्नाच्या बोहल्यावर उभा राहिलेला तरुण… डोळ्यांत संसाराची स्वप्ने… आणि दोनच दिवसांत सर्वस्व लुटून नवरी फरार! कोपरगाव तालुक्यातील रवंदा येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून लाखो रुपये आणि सोन्या-चांदीचे दागिने उकळणाऱ्या ‘लुटेरी नवरी’ टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लग्नाच्या नावाखाली आखला थंड डोक्याने कट
रवंदा येथील तरुणाशी आरोपींनी संगनमताने संपर्क साधला. विश्वास संपादन करत लग्नाची बोलणी पक्की करण्यात आली. “घरची परिस्थिती बिकट आहे”, “लग्नासाठी खर्च हवा” अशा कारणांनी तब्बल २ लाख २९ हजार रुपये रोख, तसेच सोन्या-चांदीचे दागिने उकळण्यात आले.
21 सप्टेंबर 2025 ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत संपूर्ण कट आखण्यात आला. मोठ्या थाटामाटात लग्न झाले. नवरी सासरी आली… पण अवघ्या दोनच दिवसांत तिने घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
संसार सुरू होण्याआधीच उद्ध्वस्त झालेल्या तरुणाने धाव घेतली ती थेट कोपरगाव तालुका पोलीस ठाणे येथे.
पोलिसांची झडप; नाशिकमध्ये सापळा
18 फेब्रुवारी 2026 रोजी गुन्हा दाखल होताच तपासाची सूत्रे वेगाने हलली. आरोपींचा माग काढत पोलीस पथक नाशिक येथे दाखल झाले. जत्रा चौक–आडगाव नाका परिसरात सापळा रचून कशीष सुकदेव भालेराव, नम्रता सुकदेव भालेराव आणि भुमी किरण निकम (सर्व रा. नाशिक) या तिघींना अटक करण्यात आली.
न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीत आरोपींनी खोटे लग्न लावून फसवणूक केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. गुन्ह्यातील रोख रक्कम आणि दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.
अजून तीन जण फरार
या प्रकरणात आंगणगाव (ता. येवला) येथील अशोक तान्हाजी काळे, वनिता अशोक काळे आणि नाशिकचा गोकुळ चिंदा पानकर हे तिघे अद्याप फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस व श्रीरामपूर मोबाईल सेलच्या पथकाने केली.
लग्नाच्या आमिषाला बळी पडू नका!
लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. कोणतीही ओळख पटविल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नयेत, कागदपत्रांची खात्री करूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील या घटनेने एकच खळबळ उडाली असून, दोन दिवसांच्या संसाराने लाखोंची लूट कशी केली याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. ‘लुटेरी नवरी’ टोळीचा भंडाफोड हा इतरांसाठी मोठा इशारा ठरत आहे.

