‘एन्ट्री’च्या नावाखाली पैशांची मागणी; ट्रकचालकाची धाडसी तक्रार
तक्रारदार हा ४७ वर्षीय ट्रकचालक असून, त्याच्या मालवाहू वाहनाला चेकपोस्टवरून सोडण्यासाठी वारंवार पैशांची मागणी होत असल्याचा आरोप आहे. अखेर २० मार्च रोजी त्याने नागपूर येथील ACB कार्यालयात तक्रार दाखल केली.
२३ मार्च रोजी पडताळणीदरम्यान संबंधित एजंटने ५०० रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ACB पथकाने सापळा रचत सोमवारी कारवाई अंमलात आणली.
पंचासमक्ष स्वीकारली ५०० ची लाच
लक्कडकोट चेकपोस्टवर आरोपी विलास देशमुख (खासगी एजंट) याने पंचासमक्ष तक्रारदाराकडून ५०० रुपयांची लाच स्वीकारली. तपासात या प्रकाराला मोटार वाहन निरीक्षक पवन पोटदुखे यांनी प्रोत्साहन दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, ACB पथकाची हालचाल लक्षात येताच दोघांनी घटनास्थळावरून पलायन केल्याने कारवाईला नाट्यमय वळण मिळाले.
७,१२० रुपयांची रोकड जप्त; मोबाईलही ताब्यात
कार्यालयाची झडती घेतली असता ‘एन्ट्री’च्या नावाखाली जमा करण्यात आलेली ७,१२० रुपयांची रोकड, सापळ्यातील ५०० रुपये आणि आरोपीचा मोबाईल जप्त करण्यात आला. या जप्तीमुळे चेकपोस्टवर नियमितपणे वसुली होत असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.
कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी राजुरा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित) अंतर्गत कलम ७(अ) व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास प्रगतीपथावर आहे.

