जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून एक हृदयद्रावक आणि अंगावर शहारे आणणारी घटना समोर आली आहे. आयुष्यभर साथ देण्याची शपथ घेतलेल्या पती-पत्नीने एकाच झाडाला गळफास घेत जीवन संपवल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे दोन निरागस लेकरांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
एकाच दोरीत आयुष्य संपवलं...
शिवापूर गावातील भगवान पोपट जाधव (वय 38) आणि त्यांची पत्नी आशाबाई भगवान जाधव (वय 27) यांनी आपल्या शेतात जाऊन आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. शुक्रवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास या दोघांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दुचाकीवरून हे दाम्पत्य शेतात पोहोचले, त्याच दुचाकीचा वापर करून त्यांनी झाडावर चढत आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सकाळी शेतकऱ्यांना दिसला भीषण प्रकार
सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी गेलेल्या काही शेतकऱ्यांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत पती-पत्नी दिसून आले. हा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. तत्काळ ग्रामस्थ आणि नातेवाईक घटनास्थळी धावले.
नातेवाईकांनी दोघांनाही खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.
दोन लेकरं झाली पोरकी...
या घटनेतील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे, जाधव दाम्पत्याच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुलं आहेत. शिक्षणासाठी दोघंही बाहेरगावी राहत असल्याने या दुर्दैवी घटनेच्या वेळी ते घरी नव्हते. आई-वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे ही दोन्ही लेकरं अक्षरशः अनाथ झाली आहेत.
कारण अद्याप गूढच... पोलिस तपास सुरू
भगवान जाधव हे शेतीसोबत मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मात्र, इतक्या टोकाच्या निर्णयामागे नेमकं कारण काय होतं, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. आर्थिक अडचण, कौटुंबिक तणाव की अन्य काही कारण? याचा तपास पोलीस करत आहेत.
प्रश्न अनुत्तरितच...
नेमकं काय घडलं त्या रात्री?
कशामुळे घेतला इतका टोकाचा निर्णय?
दोन लेकरांच्या भवितव्याची जबाबदारी आता कोण घेणार?
या घटनेमुळे संपूर्ण शिवापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एक हसतं-खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

