शहरातील अमली पदार्थांच्या रॅकेटवर मोठा घाव घालत धुळे स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत तब्बल १ कोटी ४२ लाख ६५ हजार २५० रुपयांचा ५७०.६१ किलो गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी विश्वजित ज्ञानेश्वर चौगुले (वय २४, रा. पवन नगर, धुळे) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध Narcotic Drugs and Psychotropic Substances Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यरात्री तीन पथकांचा एकाचवेळी छापा
विश्वजित चौगुले याने घरात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार २३ तारखेच्या मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन स्वतंत्र पथकांनी पश्चिम हुडको परिसरातील त्याच्या घरावर छापा टाकला.
या कारवाईत घरातून ४४०.७६ किलो गांजा जप्त करण्यात आला. जप्त मालाची किंमत सुमारे १ कोटी १० लाख १९ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आजीच्या घरातूनही ‘माल’ जप्त
मुख्य कारवाईनंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत मोहाडी रोडवरील दंडेवाला बाबा नगर परिसरात आरोपीच्या आजीच्या घरावरही छापा टाकला. तेथून आणखी १२९.८५ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. या मालाची किंमत ३२ लाख ४६ हजार २५० रुपये इतकी आहे.
दोन्ही ठिकाणांहून एकूण ५७०.६१ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, ही धुळे शहरातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे.
सराईत गुन्हेगार; आधीच गुन्हे दाखल
विश्वजित चौगुले हा सराईत गुन्हेगार असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच Maharashtra Police Act आणि Arms Act अंतर्गत शस्त्र बाळगल्याचेही गुन्हे नोंद आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीचे वडीलही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात सध्या कारागृहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कायदेशीर कारवाई आणि पुढील तपास
या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेल्या मुद्देमालाचे पंचनामे व नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
एनडीपीएस कायद्यानुसार व्यावसायिक प्रमाणात (commercial quantity) अमली पदार्थ साठवणे व विक्री करणे हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा असून, दोषी आढळल्यास कठोर कारावास व दंडाची तरतूद आहे.
पोलिस पथकाची कामगिरी
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी, अमरजित मोरे, अमित माळी आणि चेतन मुंडे यांच्या पथकाने केली.
शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या हालचालींवर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार, पुरवठादार आणि आर्थिक व्यवहारांची साखळी उलगडण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.
