अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात खाकीवर थेट हात उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली असून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्हाभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव विकास वैराळ असे असून ते राहुरी परिसरात कर्तव्यावर होते. याच वेळी काही कारणावरून त्यांचा स्थानिक तरुणांशी वाद झाला. हा वाद काही क्षणांतच हिंसक स्वरूप धारण करत ७ ते ८ जणांच्या टोळक्याने विकास वैराळ यांच्यावर अचानक हल्ला चढवला.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संतप्त जमावाने वैराळ यांना एका इमारतीसमोर घेरून लाथाबुक्क्यांनी व काठीने बेदम मारहाण केल्याचे स्पष्ट दिसत आहे. मारहाण इतकी निर्दयी होती की त्यांच्या अंगावरील कपडेही फाटल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. काही क्षणांपर्यंत सुरू असलेल्या या मारहाणीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी मध्यस्थी करत संतप्त जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जखमी अवस्थेतील पोलीस कर्मचारी विकास वैराळ यांना तातडीने पोलिसांच्या वाहनात बसवून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर राहुरी आणि अहिल्यानगर जिल्ह्यात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. “खाकीवर हात उचलण्याचे धाडस कसे झाले?”, “मारहाणीमागचे खरे कारण काय?” आणि “घटनास्थळी दुसरा पोलीस उपस्थित असतानाही हस्तक्षेप का झाला नाही?” अशा अनेक प्रश्नांची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
दरम्यान, राहुरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी ४ जणांसह एकूण ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
खाकी वर्दीवर उघडपणे हल्ला झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

