मिळालेल्या माहितीनुसार, शंकरराव शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सी येथे सिलेंडरचा नंबर लावण्यासाठी रांगेत उभे होते. उन्हाचा तीव्र तडाखा आणि दीर्घ प्रतीक्षा यामुळे त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जागीच कोसळले. उपस्थित नागरिकांनी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेने गावासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गॅस टंचाईमुळे आधीच नागरिक त्रस्त असताना अशा प्रकारची घटना घडल्याने संतापाची लाट उसळली आहे. “सिलेंडरसाठी रांगेत उभं राहून जीव गमवावा लागतोय, ही व्यवस्था अपयशी ठरल्याची जाणीव आहे,” अशा भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.
वंचित बहुजन आघाडीचा सरकारवर हल्लाबोल
या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
“गॅस तुटवड्याची पूर्वकल्पना असतानाही सरकारने कोणतेही ठोस नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या, तर एका ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचू शकला असता,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.
मिरा-भाईंदरमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर
दरम्यान, मिरा-भाईंदर परिसरात गॅस टंचाईबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर पोलीस आणि रेशनिंग विभागाने संयुक्त कारवाई करत विविध गॅस एजन्सी आणि गोदामांवर अचानक पाहणी केली.
या वेळी बुकिंग प्रक्रिया, पुरवठा स्थिती आणि जादा दर आकारणीबाबत सखोल चौकशी करण्यात आली.
भिवंडीत गॅस लायटर कंपनीला भीषण आग
दरम्यान, भिवंडी तालुक्यातील पडघा-कल्याण मार्गावरील सापे परिसरात गॅस लायटर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. कंपनीत मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील पदार्थ आणि गॅस सिलेंडर साठवलेले असल्याने आगीने क्षणार्धात विक्राळ रूप धारण केले.
आगीत सतत स्फोट होत असल्याने अग्निशामक दलाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
या दुर्घटनेत कंपनीच्या इमारतीत बांधून ठेवलेले सुमारे ३५ बकरे जळून मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. मात्र अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही.
प्रश्न अनुत्तरितच…
गॅस टंचाईवर ठोस उपाय कधी होणार?
सामान्य नागरिकांचा जीव अशाच प्रकारे धोक्यात येत राहणार का?
प्रशासन फक्त पाहणीपुरते मर्यादित राहणार का?
अकोल्यातील ही घटना केवळ एक अपघात नसून व्यवस्थेतील त्रुटींचं ज्वलंत उदाहरण असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आता तरी शासन जागं होणार का, हा मोठा प्रश्न आहे.

