अमरावती: शहीदांच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी देशहिताचे कार्य करावे लागेल, राष्ट्रीय एकात्मता व देशाची विविधता जपावी लागेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून बुध्दीप्रामाण्यवादी व्हावे, असे आवाहन प्रा. मधुकर जाधव यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शहीद दिनानिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने 'शहीदांच्या स्वप्नातील भारत' या विषयावर या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे होते. अधिसभा सदस्य नितीन टाले व कैलास चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. निलेश कडू आणि विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. आपल्या भाषणात प्रा. जाधव यांनी भगतसिंह यांच्यावर लाला लजपतराय यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता हे सांगितले. लाला लजपतराय यांच्या निधनानंतर भगतसिंह यांनी बदला घेतला. असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यामागे भारतीयांचे विचार ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हेतू होता, जीवितहानी करण्याचा कोणताही हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले. चंदनसिंहसारख्या ब्रिटिशांची चाकरी करणाऱ्यांनाही मारण्यात आले होते. भगतसिंह यांनी अटक करवून घेतल्यानंतर कारागृहात भारतीयांना दुय्यम वागणूक मिळत असल्याने त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले होते. ब्रिटिश काळात प्रत्येक बाबीसाठी भारतीयांना आंदोलन करावे लागत होते. बाबू गेणू यांनीही भारतातील कच्चा माल ब्रिटिशांना नेण्यास मनाई केली होती, असे दाखले प्रा. जाधव यांनी दिले. आजच्या युवकांनी आपल्या ज्ञानकौशल्याचा उपयोग समाजहित आणि देशहितासाठी करावा, शहीदांचे चरित्र वाचावे, विचार आत्मसात करावेत आणि ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. अधिसभा सदस्य नितीन टाले म्हणाले की, क्रांतिकारकांनी तरुण वयातच सर्वस्वाचा त्याग करून देश स्वातंत्र्यासाठी लढा दिला. आजच्या तरुणांनी आपल्यासमोरील आव्हानांना सामोरे जावे. विद्यार्थीही समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात, असे टाले यांनी नमूद केले. कैलास चव्हाण यांनी सांगितले की, ब्रिटिशांची सत्ता उलथवण्यासाठी क्रांतिकारकांनी मोठे बलिदान दिले. अवघ्या तेवीस वर्षांच्या वयात भगतसिंह यांनी अनेक पुस्तके वाचली आणि अभ्यास केला. लाला लजपतराय यांच्याकडून त्यांनी देशभक्तीचे धडे घेतले. युवकांनी पुस्तके वाचावीत, स्वप्न पहावीत आणि पुढे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
3/related/default

