प्रेमविवाहातून पेटला संताप
खडका (ता. भुसावळ) येथील चेतन दिलीप जंगले (नाव बदललेले) या तरुणाने आपल्या समाजातीलच धनश्री पाटील (नाव बदललेले) हिच्याशी १८ मार्च २०२६ रोजी नाशिक येथील पंचवटी परिसरात प्रेमविवाह केला. विवाहानंतर १९ मार्च रोजी दोघांनी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली होती. त्यानंतर ते तरुणाच्या मामाच्या घरी मुक्कामी होते.
मात्र हा विवाह मुलीच्या माहेरच्या नातेवाईकांना मान्य नव्हता. २० मार्च रोजी दहा ते बारा जणांनी एकत्र येत तरुणाच्या मामाच्या घरी धडक दिली. प्रथम तरुणीला मारहाण करून जबरदस्तीने नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर संतप्त जमावाने तरुणाला पकडत अमानुष अत्याचार सुरू केले.
नग्न करून गावभर धिंड
संशयितांनी तरुणाला खांबाला बांधून त्याचे कपडे काढत नग्न अवस्थेत लोखंडी रॉड व दगडाने मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. एवढ्यावरच न थांबता त्याची दुचाकीवरून गावात ने-आण करत सार्वजनिकरित्या अपमानित केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मारहाण इतकी क्रूर होती की तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.
जीवे मारण्याचा प्रयत्न?
मारहाणीची तीव्रता पाहता जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावातील काही जबाबदार नागरिकांनी मध्यस्थी करत तरुणाची सुटका केली; अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
यावेळी संशयितांनी तरुणाच्या आई-वडिलांनाही घर जाळण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दहा ते बारा संशयितांविरुद्ध मारहाण, अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न, धमकी व अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच जणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.
समाजमन सुन्न
एकाच समाजातील असूनही प्रेमविवाहाला विरोध करत तरुणावर झालेल्या अमानुष अत्याचारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कायदा हातात घेतल्यास कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे—प्रेमविवाह अजूनही काही ठिकाणी गुन्हा मानला जातो का? कायद्याच्या राज्यात अशा जमावशाहीला आळा बसणार का?
तपास सुरू असून पुढील कारवाई पोलिसांकडून करण्यात येत आहे.
