धुळे शहराला हादरवून सोडणाऱ्या देवपूर येथील पिता–पुत्र दुहेरी खून प्रकरणाचा तब्बल सात वर्षांनंतर निकाल लागला असून न्यायालयाने माजी नगराध्यक्षासह ११ आरोपींना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. धुळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या या निर्णयाने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. शिक्षा जाहीर होताच आरोपी
ढसाढसा रडू लागले, तर त्यांच्या नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले.
ढसाढसा रडू लागले, तर त्यांच्या नातेवाईकांनाही अश्रू अनावर झाले.
धुळे शहरातील देवपूर परिसरात ८ जून २०१८ रोजी पूर्ववैमनस्यातून रावसाहेब पाटील आणि त्यांचा मुलगा वैभव पाटील यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दुहेरी खून प्रकरणाने त्या वेळी संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गाजलेल्या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयश्री पुलाटे यांच्या न्यायालयात सुरू होती. उभय पक्षांचा युक्तिवाद, परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि तपासातील नोंदी यांचा सखोल विचार केल्यानंतर न्यायालयाने कठोर निर्णय दिला.
न्यायालयाने माजी नगराध्यक्ष बाजीराव ऊर्फ सुभाष सजन पवार, त्याचा मुलगा गौरव पवार, भूपेश वाल्मिक पाटील, हर्षल ऊर्फ दादू रविंद्र पाटील, जयराज शामकांत पाटील, ऋषिकेश शामकांत पाटील, दर्शन अंबादास परदेशी, भगवान नानाभाऊ अहिरे, अर्जुन ऊर्फ आप्पा भगवान अहिरे, भूषण बाबुराव कापकर आणि भूषण निंबा पगारे या ११ आरोपींना भारतीय दंड विधान कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
तसेच आरोपी संदीप ऊर्फ विक्की दिलीप वेळीस याला आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याच्या आरोपाखाली भारतीय दंड विधान कलम २१२ अंतर्गत दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
न्यायालयात मोठी गर्दी
या खटल्याचा निकाल लागणार असल्याने गुरुवारी धुळे जिल्हा न्यायालयात मोठी गर्दी उसळली होती. दुपारी साडेतीन वाजता न्यायालयीन कामकाज सुरू झाले. सर्व आरोपींना न्यायाधीशांसमोर उभे करण्यात आले. त्यानंतर न्यायाधीशांनी एकामागोमाग एक आरोपींची नावे घेत शिक्षा जाहीर केली.
दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याचे ऐकताच न्यायालयात उपस्थित आरोपींचा हंबरडा फुटला. काही आरोपी रडू लागले, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही अश्रू अनावर झाले. या भावनिक वातावरणामुळे काही काळ न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
एका आरोपीची सुटका
दरम्यान, आरोपी संदीप ऊर्फ विक्की वेळीस हा गेल्या साडेसात वर्षांपासून तुरुंगात असल्याने त्याने शिक्षा कालावधीपेक्षा जास्त कारावास भोगला असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याला पाच हजार रुपयांचा दंड भरून या खटल्यातून सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
तसेच या प्रकरणातील संशयित वैभव ऊर्फ सोनू अरुण पवार हा घटना घडली त्या दिवशी अमळनेर येथे असल्याचे पुराव्यातून स्पष्ट झाल्याने न्यायालयाने यापूर्वीच त्याला आरोपमुक्त केले होते.
सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद
या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अॅड. देवेंद्र तंवर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच फिर्यादी पक्षातर्फे अॅड. निलेश दुसाणे यांनीही न्यायालयासमोर ठोस पुरावे सादर करत आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने या सर्व पुराव्यांचा सखोल विचार करून हा ऐतिहासिक निर्णय दिला.
दुर्मिळातील दुर्मिळ शिक्षा
या खटल्यात एकाच प्रकरणात तब्बल ११ आरोपींना दुहेरी जन्मठेप सुनावण्याचा निर्णय अत्यंत दुर्मिळ मानला जात आहे. या प्रकरणात माजी नगराध्यक्ष बाजीराव पवार याने कट रचल्याचे तपासातून समोर आले होते आणि त्यानंतर रावसाहेब पाटील व वैभव पाटील या पिता–पुत्रांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
जिल्हा सरकारी वकील अॅड. देवेंद्र तंवर यांनी सांगितले की, या खटल्यात सादर केलेले पुरावे आणि साक्षी यांच्या आधारे न्यायालयाने कठोर निर्णय दिला असून हा निर्णय न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा आहे.

