अडीच लाख रुपयांच्या कर्जासाठी एका शिक्षकाला अवैध सावकारांच्या जाळ्यात अडकवून तब्बल साडेआठ लाख रुपयांचे व्याज उकळण्यात आले. इतकेच नव्हे तर पैसे देण्यास असमर्थ ठरल्यावर संबंधित शिक्षकाला घरातून उचलून नेऊन कार्यालयात डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक रोड परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इखलाख अहमद मुश्ताक अहमद हे नाशिक रोड परिसरातील उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी २०१७ साली नाशिक रोड परिसरात अवैध सावकारी करणाऱ्या चंद्रशेखर प्रभाकर शिंदे उर्फ पिंटू शिंदे याच्याकडून दरमहा तब्बल ७ टक्के व्याजदराने अडीच लाख रुपये कर्ज घेतले होते. या रकमेवर त्यांनी सुमारे २५ महिन्यांत ४ लाख ३७ हजार ५०० रुपये व्याज अदा केले.
मात्र आर्थिक अडचणी कायम असल्याने २०२० साली त्यांनी पुन्हा १० टक्के व्याजदराने दोन लाख रुपये घेतले. या रकमेवरही त्यांनी १ लाख ४० हजार रुपये व्याज भरले. त्यानंतर पुन्हा पैशांची गरज भासल्याने त्यांनी आपले घर आणि इनोव्हा कार गहाण ठेवून आणखी दोन लाख रुपये घेतले. या रकमेवर केवळ चार महिन्यांत ८० हजार रुपये व्याज आकारण्यात आले

