शिरपूर/प्रतिनिधी : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये सदस्य व थेट सरपंच पदे रिक्त झाल्याने पोटनिवडणुकीची अधिकृत घोषणा होताच ग्रामीण राजकारणात हालचालींना वेग आला आहे. ४७ ग्रामपंचायतींमधील सदस्यपदे आणि ११ थेट सरपंचपदांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून २९ एप्रिलला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहेत.
राज्य निवडणूक यंत्रणेने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदारांकडून ३० मार्च रोजी निवडणूक नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना ७ ते १३ एप्रिल दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत नामनिर्देशन अर्ज सादर करता येतील. १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर १७ एप्रिल दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. त्याच दिवशी अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. आवश्यक असल्यास २८ एप्रिल रोजी मतदान होईल.
आचारसंहिता लागू; प्रशासन सज्ज
निवडणूक जाहीर होताच संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासनाने मतदान केंद्रांची तयारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, साहित्याची उपलब्धता यांसह सर्व प्रक्रियांना वेग दिला आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे.
राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे; मात्र अर्जासोबत आवश्यक हमीपत्र जोडणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
११ सरपंच, ४७ सदस्य पदांसाठी रणधुमाळी
जिल्ह्यात थेट सरपंचांची ११ आणि सदस्यांची ४७ पदे रिक्त आहेत. साक्री, शिरपूर, धुळे आणि शिंदखेडा या तालुक्यांतील विविध गावांमध्ये ही निवडणूक होणार आहे.
साक्री तालुका : वरसूस, विहीरगाव, हारपाडा/सांडेर, किरवाडे, खरडबारी, मोहगाव, जेबापूर, डांगशिरवाडे, बासर, कोर्डे, नवेनगर, वसमार, जामखेड, चिंचपाडा, चरणमाळ, बोदगाव, कुडाशी आदी गावांतील सदस्यपदे रिक्त आहेत.
शिरपूर तालुका : अजनाड, खर्दे खुर्द, पाथर्डे, निमझरी, वाघाडी, टेंभेपाडा, तोंदे, नांथे, भोईटी, मांजरोद, लौकी, उर्मदा, बोडकी येथे सदस्य निवडणूक होणार आहे.
धुळे तालुका : हडसुणी, आर्णी, बेहेड, सैताळे, विश्वनाथ/सुकवड, नावरा येथे सदस्य पदांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.
शिंदखेडा तालुका : साळवे, परसामळ/कुमरेज, सतारे, रामी येथेही सदस्य निवडले जाणार आहेत.
थेट सरपंचपदांसाठी साक्रीतील वरसूस, तामसवाडी; शिरपूरमधील खर्दे बुद्रुक, चांदसे/चांदसूर्या, तऱ्हाड कसबे, पनाखेडा; धुळे तालुक्यातील विश्वनाथ/सुकवड, नावरा, हेंकळवाडी/तामसवाडी; तसेच शिंदखेड्यातील दरणे या गावांचा समावेश आहे.
ग्रामीण राजकारण तापले
ग्रामपातळीवरील सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता लक्षात घेता स्थानिक राजकीय गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुक उमेदवारांकडून गाठीभेटी, प्रचारयोजना आणि मतदारांशी संपर्क मोहिमा वेगाने राबवल्या जात आहेत. अनेक ठिकाणी पॅनेल जुळवाजुळव आणि सामाजिक समीकरणांवर चर्चांना उधाण आले आहे.
या पोटनिवडणुकीकडे आगामी स्थानिक राजकारणाची रंगीत तालीम म्हणून पाहिले जात असून, निकालानंतर काही ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतराची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण मतदार मात्र विकासाच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

