जामनेरमध्ये अवैध ताडीचा मोठा साठा जप्त; आरोपी फरार, पत्नीवर गुन्हा दाखल!

फुले शाहू आंबेडकर
0
जळगाव | प्रतिनिधी -:  जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात अवैध ताडी विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून राज्य उत्पाद शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 100 लिटर ताडीचा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, नेरी बु. (ता. जामनेर) येथील अवैध ताडी विक्रीबाबत तक्रार पोर्टलवरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे 8 एप्रिल 2026 रोजी राज्य उत्पाद शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अचानक धाड टाकली. ही कारवाई राज्य उत्पाद शुल्क अधीक्षकांच्या निर्देशानुसार करण्यात आली होती.
या धाडीत संशयित सचिन भीमराव भंडारी यांच्या घराची झडती घेण्यात आली असता, घरातून तब्बल 100 लिटर ताडीने भरलेला ड्रम, तसेच अंदाजे 2 किलो सॅकरीन आणि 2 किलो क्लोरल हायड्रेट असा संशयास्पद मुद्देमाल जप्त करण्यात आला. या रसायनांचा वापर ताडीमध्ये भेसळ करण्यासाठी होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, कारवाईदरम्यान संशयित सचिन भंडारी हा घरातून पसार झाला असून त्याला फरार घोषित करण्यात आले आहे. तर त्याची पत्नी श्रीमती श्रीदेवी सचिन भंडारी यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्य उत्पाद शुल्क विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुढील तपास सुरू केला असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक सक्रिय करण्यात आले आहे.
कायदेशीर बाबी लक्षात घेऊन…
या प्रकरणात आरोपींवर राज्य उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून न्यायालयीन प्रक्रियेअंती दोष सिद्ध होईपर्यंत संबंधित व्यक्ती निर्दोष मानली जाईल.
 स्थानिकांमध्ये संताप…
गावात अवैध दारू विक्रीमुळे तरुण पिढी बिघडत असल्याची भावना व्यक्त करत नागरिकांनी अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात, अशी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Please Select Embedded Mode To show the Comment System.*

3/related/default